महाराष्ट्र ग्रामीणराजकारणवाहतूक
बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले यांचा मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा : गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे आदेश
दौऱ्यात शिवसेना नेते किशोरशेठ जैन यांनी मांडला नागोठण्यातील समस्यांचा पाढा

बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले यांचा मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा : गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे आदेश
दौऱ्यात शिवसेना नेते किशोरशेठ जैन यांनी मांडला नागोठण्यातील समस्यांचा पाढा
महामार्ग पूर्ण करण्यासाठी बांधकाम मंत्र्यांची एक वर्षाची नवीन डेडलाइन
महेश पवार
नागोठणे : गणेशोत्सव जवळ आला की, मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांचे दौरे सुरू होणे हे गेली अनेक वर्षे त्रस्त झालेल्या वाहनचालकांच्या व नागरिकांच्या अंगवळणी पडले आहे. अशाच यावर्षीचा गणेशोत्सव आता जवळ येणार असल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले यांनी १८ वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा पुन्हा एकदा पाहणी दौरा केला. सर्व पक्षांच्या आघाडी व महायुती सरकारने दिलेल्या डेडलाइन फोल ठरलेल्या असतांनाच या दौऱ्याचे नक्की काय फलित होणार याचा पूर्ण अंदाज नागरिकांना असल्याने हा दौरा सुद्धा केवळ एक फार्सच ठरणार की, काय अशी चर्चा वाहनचालक व नागरिकांतून होत आहे. दरम्यान मुंबई गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त करण्याचे आदेश बांधकाम मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच महामार्ग १०० टक्के पूर्ण करण्यासाठी अजून एक वर्ष लागेल असे स्पष्ट करून बांधकाम मंत्र्यांनी एक वर्षाची अजून एक नवीन डेडलाइन दिली आहे.

या दौऱ्याच्या निमित्ताने मुंबई गोवा महामार्गाच्या नागोठणे परिसरात कोलेटी पासून सुकेळी पर्यंत रखडलेल्या महामार्गाबरोबरच कोलेटी पासून नागोठण्यातील दोन किलोमीटरच्या अंतरातील अपूर्ण असलेले चार उड्डाण पूल, पाण्याचा निचरा होण्यासाठी न केलेले योग्य नियोजन, सर्वच सर्व्हिस रोडची झालेली दुर्दशा, काम पूर्ण केलेल्या रस्त्यावरही पडलेले खड्डे आणि त्यामधून वाहने चालवितांना वाहनचालकांची होणारी कसरत व अपघातांचा धोका, अंबा नदीला येणारे छोटे छोटे पूर टाळण्यासाठी संरक्षण भिंत बांधणे, पुराच्या वेळेस नागरिकांसाठी निवारा सभागृह बांधण्यासाठी लागणार मोठा निधी यांसह अनेक बाबतीत शिवसेना (उबाठा) जिल्हा सहसंपर्क प्रमुख व सत्ताधारी नागोठणे ग्रामपंचायतीचे प्रमुख मार्गदर्शक किशोरशेठ जैन यांनी या सर्व समस्यांचा पाढा बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले यांच्यासमोर वाचला. तसेच नागोठण्याच्या सर्व प्रश्नांसाठी मंत्रालय स्तरावर लवकरात लवकर एक बैठक लावण्यात यावी यासाठी बांधकाम मंत्र्यांना निवेदन दिले. बांधकाम मंत्र्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

नागोठण्यातील मुरवाडी फाटा येथे गुरुवारी(दि.७) दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास बांधकाम मंत्र्यांचा ताफा थांबला. त्यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक आमदार रविशेठ पाटील होते. तसेच यावेळी किशोरशेठ जैन, जिल्हाधिकारी किशन जवळे, पोलिस अधीक्षक आँचल दलाल, रोहाचे प्रांत ज्ञानेश्वर खुटवड, रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख, नागोठण्याचे पहिले लोकनियुक्त सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच अखलाक पानसरे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, संतोष नागोठणेकर, चंद्रकांत गायकवाड, ग्रामसेवक राकेश टेमघरे, शिवसेना शाखाप्रमुख धनंजय जगताप, प्रवीण ताडकर, आनंद लाड, तिरथ पोलसानी, शेखर गोळे, भरत गिजे, दिनेश घाग, मंजर जुईकर, समीर भिकन, काझिम पानसरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच अन्य शासकीय अधिकारी व नागरिक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी नागोठण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.




