अपघातनिधनमहाराष्ट्र ग्रामीण
जंगली पीर येथील अंबा नदीच्या पात्रात सापडला मृतदेह
एन व्ही एस एस आर टीमकडून मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत

जंगली पीर येथील अंबा नदीच्या पात्रात सापडला मृतदेह
एन व्ही एस एस आर टीमकडून मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत
महेश पवार
नागोठणे : वाकण – पाली मार्गालगत असलेल्या अंबा नदीच्या पात्रात आणि तामसोली गावालगत असलेल्या जंगली पीरच्या मागील बाजूस गुरुवारी (दि.२८) सायंकाळी सापडलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. नागोठण्यातील एन व्ही एस एस आर टीमकडून हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य राबविण्यात आले. नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी व पाली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक हेमलता शेरेकर या पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एन व्ही एस एस आर टीम कडून मृतदेह बाहेर काढण्यासाठी यशस्वी मोहीम राबविण्यात आली.

यासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जंगली पीरच्या मागील बाजूस अंबा नदीच्या पात्रात एक मृतदेह असल्याची माहिती नागोठणे पोलिसांना मिळाली. त्यावेळी नागोठणे पोलिस ठाण्यातून पो. हे. कॉ. स्वप्नील भालेराव यांनी नागोठण्यातील एन व्ही एस एस आर टीमच्या मदतीची आवश्यकता असल्याचे टीमचे अध्यक्ष अखिल शेलार यांना भ्रमणध्वनी वरून सांगितले. तसेच या मृतदेहाला पाण्याबाहेर काढण्यासाठी तुमची टीम या ठिकाणी येऊ शकते का ? अशी विचारणा केली. एन व्ही एस एस आर रेस्क्यू टीमने त्यांच्या विनंतीला मान देऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या टीमने मृतदेहाला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाहेर काढले.
या टीम मध्ये नागोठणे टीमचे अध्यक्ष अखिल शेलार, सदस्य सूरज राणे, निखिल शेलार, सनिस मिणमिणे, साहिल राणे, नीरज बडे, कल्पेश बडे, दीपेश राणे, दिनेश घासे, मनोज माळी, सुजल अडसुळे, प्रथमेश शेलार यांचा समावेश असून यावेळी पाली व नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारीही उपस्थित होते.
जंगली पीर जवळील अंबा नदीच्या पात्रात सापडलेल्या या मृतदेहाची ओळख पटली असून सदरची व्यक्ती शिलोशी आदिवासी वाडी (ता.सुधागड) येथील रहिवासी असून या व्यक्तीचे नाव मनोहर कोळी(वय ३० वर्षे) असे आहे. या घटनेची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पाली पोलिस करीत आहेत.




