जेएसडब्लू कंपनीच्या डेप्युटी मॅनेजर पदी अनुराग पाटील
जेएसडब्लू कंपनीच्या सौजन्याने करणार एम. टेक

जेएसडब्लू कंपनीच्या डेप्युटी मॅनेजर पदी अनुराग पाटील
जेएसडब्लू कंपनीच्या सौजन्याने करणार एम. टेक
महेश पवार
नागोठणे : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गडब येथील जेएसडब्लू स्टील लिमिटेड या नामांकित कंपनीच्या डेप्युटी मॅनेजरपदी (प्रोजेक्ट) जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील तरुण होतकरू इंजिनिअर तसेच श्री गणेश पॅथोलॉजी लॅबचे संचालक सुनील पाटील व शुभांगी पाटील यांचे सुपुत्र अनुराग पाटील यांची वयाच्या २६ व्या वर्षी नियुक्ती झाल्यामुळे अनुराग पाटील यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान पदोन्नती बरोबर अनुराग पाटील यांची जेएसडब्लू कंपनी च्या सौजन्याने पवई (मुंबई ) येथील आय. आय. टी. या नामांकित कॉलेज मध्ये एम. टेक. च्या शिक्षणासाठी देखील निवड झाली आहे.

अनुराग सुनील पाटील यांची काही वर्षांपूर्वी एम. आय. टी. आळंदी (पुणे ) कॉलेज मधून कॅम्पस द्वारे इंटरव्हू देऊन जेएसडब्लू स्टील लिमिटेड, डोळवी – पेण – रायगड या कंपनीत ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनीअर ( बी. टेक. मेकॅनिकल) म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर अनुराग यांची टेक्निकल ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर व डेप्युटी मॅनेजर म्हणून पदोन्नती झाली.
अनुराग यांना एम. टेक. करण्याचे स्वप्न होते. अनुराग यांनी शिक्षणासाठी वेळोवेळी स्कॉलरशिप मिळविली होती. त्यामुळे पुढील उच्च शिक्षण घेईन ते स्कॉलरशिपच्या माध्यमातूनच घेईन असा त्यांचा मानस व स्वप्न होते. नोकरी लागली तरी अनुराग अभ्यास करतच होते. पुस्तकांशी असलेली मैत्री त्यांनी कधीही तोडली नाही. आपले आई वडील यांना विश्वास दिला आणि आज ते त्या विश्वासाला पात्र ठरले. जेएसडब्लू या कंपनीच्या सौजन्याने अनुराग नोकरीसह एम. टेक.चे शिक्षण घेत आहेत. अनुराग यांनी आपली एम. टेक. ही पदवी संपादन करण्यासाठी कठोर मेहनत घेण्यास सुरवात केली आहे. आपण पाहिलेले स्वप्न मेहनत व चिकाटीच्या जोरावर पूर्ण करू शकतो. त्यामुळे भरपूर मेहनत करा आपल्याला यश निश्चित प्राप्त होईल असा मोलाचा सल्ला अनुराग यांनी तरुण विध्यार्थ्यांना दिला आहे.




