धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीणसांस्कृतिक
नागोठण्याच्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाचा पालीत थरार
"एक गाव, एक गोविंदा" आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला : किशोरभाई जैन

“एक गाव, एक गोविंदा” आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला : किशोरभाई जैन
नागोठण्याच्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाचा पालीत थरार
पालीतील दोन्ही मनाच्या हंड्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने फोडल्या
१२ वर्षीय बाल गोविंदा कुमारी सान्वी राऊत हिचेही कौतुक
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यात गेल्या २–३ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या एक गाव एक गोविंदा टॅग लाइन खाली एकत्र आलेल्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने आपल्यातील सर्व कलाकुसर पणाला लावत नागोठण्याजवळील पाली (ता.सुधागड) येथील प्रकाशभाऊ देसाई मित्रमंडळ व शिवसेना यांच्याकडून बांधण्यात आलेल्या दोन्ही मानाच्या दही हंड्या आठ थर लावून फोडण्याची अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यामुळे नागोठणे ग्रामदेवता आई जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात ३०० तरुणांचा समावेश असलेल्या या गोविंदा पथकाला पुरस्कृत केलेल्या टी शर्टचे १४ ऑगस्ट रोजी रात्री अनावरण करतांना या गोविंदा पथकाच्या यशासाठी आई जोगेश्वरी मातेला केलेली प्रार्थना आणि गोविंदा पथकावर मी दाखविलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला असल्याची प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) नेते किशोरभाई जैन यांनी व्यक्त करून या गोविंदा पथकाला तसेच आठव्या थरावरील १२ वर्षीय बाल गोविंदा कुमारी सान्वी संजय राऊत हिचेही कौतुक
करून सर्वांना कौतुकाची थाप दिली आहे.

नागोठण्यातील सर्व आळींमधून तसेच शहरातील सर्वच भागातून पूर्वीपासून सुरू असलेल्या गोविंदा पथकाने एकत्र येत २–३ वर्षांपूर्वी आई जोगेश्वरी गोविंदा पथक स्थापन केले होते. ज्याप्रमाणे रोहा शहरात एक गाव एक गणपती अस्तित्वात आहे त्याप्रमाणेच नागोठण्यातील तरुणांनी गोविंदा पथकाच्या निमित्ताने एकत्र यावे आणि त्यामुळे गावातील तरुणांमधील आपली एकजूट व तरुणांची एकी टिकून राहण्यास मदत होईल अशी इच्छा किशोरभाई जैन यांनी तरुणांजवळ व्यक्त केली होती आणि त्यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत असेही आश्वासनही किशोरभाई जैन यांनी या तरुणांना दिले होते. त्यानुसारच नागोठण्यातील विविध आळीतील तरुणांचे गोविंदा पथक तसेच नागोठण्याजवळील वरवठणे, कडसुरे व निडी येथील काही तरुणांनी एकत्र येत आई जोगेश्वरी गोविंदा पथक स्थापन केले होते. या गोविंदा पथकाचे अध्यक्ष असलेले विहान जिमचे मालक भरत गिजे, प्रशिक्षक राजेश सुर्वे, स्वप्नील भोसले व रवी जासूद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तरुण व बालगोपालांच्या सहकार्याने कसून सराव करून आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने हे भव्य दिव्य यश मिळविले आहे.

नागोठण्यातील आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने रोहा व इतर ठिकाणी न जाता केवळ पाली येथील शिवसेनेची रुपये ३ लाख रुपयांची मानाची दहीहंडी व भाजपा नेते प्रकाशभाऊ देसाई मित्र मंडळाची रुपये २ लाख, २२ हजार रुपयांची मानाची दहीहंडी यावरच आपले लक्ष केंद्रित केले. नागोठण्यातील मानाच्या दही हंड्यांना सलामी दिल्यानंतर सायंकाळी ६ वाजल्यानंतर आई जोगेश्वरी गोविंदा पथक पाली येथे रवाना झाले. पाली मधील मानाच्या या दोन्ही दही हंड्या आठ थर लावून पहिल्याच प्रयत्नांत अगदी सहजपणे फोडून आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने सुधागड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आपल्या नाव लौकिकात भर घातली. आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या या यशाबद्दल त्यांच्यावर नागोठण्यासह संपूर्ण विभागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





