पूरमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण
विजेच्या मुख्य समस्येसह अनेक विषयांवर गाजली नागोठण्यातील आढावा बैठक
आमदार रविशेठ पाटील यांची सर्व समस्या मार्गी लावण्याची अधिकाऱ्यांना तंबी

विजेच्या मुख्य समस्येसह अनेक विषयांवर गाजली नागोठण्यातील आढावा बैठक
आमदार रविशेठ पाटील यांची सर्व समस्या मार्गी लावण्याची अधिकाऱ्यांना तंबी
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ७ कोटी रुपये निधी मंजूर
नागोठणे रोहा रस्त्याचा काँक्रीटीकरणचा प्रस्ताव
महेश पवार
नागोठणे : नागोठणे शहर व ग्रामीण विभागात सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा, वीज ग्राहकांच्या परवानगी शिवाय स्मार्ट मीटर बसविणे या मुख्य प्रश्नांसह महामार्गाची दुरावस्था, नागोठणेतील मुख्य रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर झालेले अतिक्रमण, अनधिकृत टपऱ्या, तामसोली मधील स्मशानभूमीची दुरावस्था, नागोठणे रोहा मार्गावरील भिसे खिंडीतील वृक्ष व दरडींचा वाढता धोका, मुख्य रस्त्यालगतच्या गटाराची झालेली दुर्दशा, नागोठणे कन्या शाळेच्या इमारतीचे दुरुस्ती कामातील गोंधळ, राजिप शाळांतील विद्यार्थ्यांची घटणारी संख्या व त्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याचा धोका यांच्यासह अनेक विषयांवर आमदार रविशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेली शासकीय आढावा बैठक चांगलीच गाजली. याच सभेत नागरिकांनी उपस्थित केलेल्या सूचना व तक्रारींना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मार्गी लावण्याची तंबी आ. रविशेठ पाटील यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिली आहे.

आमदार रविशेठ पाटील यांच्या या शासकीय आढावा बैठकीला रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार डॉ. किशोर देशमुख, राजिपचे माजी सदस्य किशोरशेठ जैन, नरेंद्र जैन, सदानंद गायकर, मधुकर ठमके, मारुती देवरे, महसूल नायब तहसीलदार पी.बी.मोकल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सोपानभाऊ जांबेकर, नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक, माजी सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, माजी सरपंच विलास चौलकर, किशोरभाई म्हात्रे, भाजपा तालुका चिटणीस एकनाथ ठाकूर, आनंद लाड, नागोठणे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जैन, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप डालु, उप कार्यकारी अभियंता बालाजी चात्रे, सहाय्यक अभियंता सत्येंद्र सिंग, रोहा पं. स. च्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील, विस्तार अधिकारी एस.एन. गायकवाड, नागोठणे सपोनी सचिन कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता व्ही.आर. बागुल, वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट, सिराजभाई पानसरे, बाळासाहेब टके, सुभाष पाटील, संतोष लाड, संजय काकडे, धनंजय जगताप, गणपत म्हात्रे, नागोठणे उपसरपंच अखलाक पानसरे, ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे, अनंत वाघ, निखिल मढवी, प्रशांत भोईर, प्रथमेश काळे, ग्रा. पं.सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, प्रकाश कांबळे, संतोष नागोठणेकर, शबाना मुल्ला, सुप्रिया काकडे, पूनम काळे, अमृता महाडिक, भाविका गिजे आदींसह नागरिक तसेच शासनाच्या सर्वच खात्याचे आणि कधीही न दिसणारे बहुतांश अधिकारी या बैठकीला आवर्जून उपस्थित होते.

या सभेत रविशेठ पाटील यांनी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध कामांसाठी मंजूर झालेला ७ कोटी रुपयांचा निधी तसेच नागोठणे रोहा रस्त्यासाठी सिमेंट काँक्रीटीकरणचा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती दिली. तसेच बांधकाम मंत्र्यांचा महामार्ग पाहणी दौरा लवकरच होणार असल्याने महामार्ग आठ दिवसांत खड्डेमुक्त करा, सर्व्हिस रोड सुस्थितीत करा, कुणाचा मीटर नादुरुस्त असेल तरच तो बदला, स्मार्ट मीटरची सक्ती करू नका, ३०–४० वर्षे विजेचे खांब, वीज वाहिन्या बदलल्या नसल्याने विजेच्या सर्व दुरुस्त्या तातडीने करून गणपतीपूर्वी विद्युत पुरवठा सुरळीत करा, खासगी इंग्रजी शाळांकडे पालकांची ओढ थांबण्यासाठी व गरीब विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या मराठी शाळांचा दर्जा सुधारा या सूचना करतानाच नागोठण्यातील पाणी योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची लवकरच बैठक लावण्यात येईल असेही आमदार रविशेठ पाटील यांनी स्पष्ट केले.
राजिपचे माजी सदस्य किशोरशेठ जैन यांनी अंबा नदीची खोली वाढविण्यासाठी गाळ काढणे, छोट्या छोट्या पुराचा नागोठणे शहराला होणारा धोका टाळण्यासाठी नदीला संरक्षित भिंत बांधणे, पुराच्या वेळेस पूरग्रस्त नागरिकांना हक्काचा निवारा म्हणून ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीच्या जागी प्रशस्त हॉल बांधण्यासाठी निधी मंजूर करणे, रखडलेली नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजना अशा अनेक महत्वपूर्ण विषयांवर मंत्रालय स्तरावर एक बैठक लवकरात लवकर लावण्यात यावी अशी महत्वपूर्ण सूचना आमदार रवीशठ पाटील यांच्याकडे केली. यासाठी तातडीने मीटिंग लावण्याचे आश्वासन आ. रविशेठ पाटील यांनी दिले.
नागोठणे विभागाला लागलेला इको सेन्सिटिव्ह झोन हटविण्याची महत्वपूर्ण सूचना नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीचे सभापती सदानंद गायकर यांनी केली. तर नागोठण्यातील रखडलेली शुद्ध पाणी पुरवठा योजना, रोहा तहसील मधील सेतू कार्यालयात नागरिकांची होणारी गैरसोय व विविध दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांची होणारी रखडपट्टी याविषयी विलास चौलकर यांनी प्रश्न उपस्थित केले. पळस, कोलेटी विभागात शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जेसडब्लू कंपनीच्या उच्च वीज दाबाचे मनोरे उभारण्याचे सुरू असलेले काम याविषयी प्रशांत भोईर यांनी प्रश्न उपस्थित केला.
सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे यांनी सांगितले की, रोहा तहसीलदार श्री. किशोर देशमुख यांनी तालुक्याचा पद स्विकारल्या पासून नागोठणे विभागात दोन ते तीन वर्षामध्ये नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करणेकामी एकदाही मिटींग घेतलेली नाही. गोरगरीब आदीवासी व तालुक्यातील नागरीकांना नवीन रेशनकार्ड देताना अडवणूक केली जाते. सेतूमध्ये नागरिकांना प्रतिज्ञापत्राची वाट पाहत बसावे लागते. तसेच आज आमदार साहेब आपण आहात म्हणून लाईट गेली नाही. नाहीतर सकाळ पासून अनेकवेळा तसेच रोज रात्री ९ वाजता लाईट जाते. त्यामुळे हे महावितरणचे अधिकारी विज बलाढ्य कंपन्यांना विकतात की काय ? असा आरोपही किशोरभाई म्हात्रे यांनी केला.
या सभेचे आभार प्रदर्शन रोहाचे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी केले. आमदार रविशेठ पाटील यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी घेतलेल्या या आढावा बैठकीतून नागरिकांचे प्रश्न नक्कीच मार्गी लागतील अशी अपेक्षा सर्वसामान्य नागोठणेकर नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.