महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिकसांस्कृतिक
श्री अष्टविनायक पतसंस्था भविष्यातही चांगली व तत्पर सेवा देणार : विलास चौलकर
सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

श्री अष्टविनायक पतसंस्था भविष्यातही चांगली व तत्पर सेवा देणार : विलास चौलकर
श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर
महेश पवार
नागोठणे : कोविड काळात सर्व ठप्प झालेले असतांनाच अष्टविनायक पतसंस्थेने आमच्या ग्राहकांना अखंडित सेवा दिली. आमचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार व संचालक मंडळ यांच्या सहकार्यामुळेच केवळ चार कर्मचाऱ्यांवर ही संस्था चालवताना आम्ही १५ कोटींच्या वर उलाढाल करून गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट नफा मिळवून ऑडिट अ वर्ग मिळविला आहे. संस्थेचे वसुली पथकही चांगले काम करीत आहे. मंदीच्या काळात इतर पतसंस्थांनी कर्ज देणे थांबविले मात्र आपल्या संस्थेने त्यावेळी अनेकांना कर्ज देऊन उभे करण्यास मदत केली. विना सहकार, नाही उद्धार आणि एकीचे बळ, मिळते फळ या तत्वाने चालल्यानेच आम्हाला हे यश मिळाले आहे. त्यामुळेच भविष्यातही आम्ही अशीच चांगली व तत्पर सेवा देत राहू असे अभिवचन नागोठण्यातील नावाजलेल्या श्री अष्टविनायक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांनी २७ व्या वार्षिक सभेत दिले. याचवेळी त्यांनी आमची कुणाशीही स्पर्धा नाही असे स्पष्ट करून सभासदांना १० टक्के लाभांशही जाहीर केला.

नागोठण्यातील आराधना भवन येथे शनिवारी (दि.२०) सायंकाळी संपन्न झालेल्या या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे, नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, राजिपचे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद वाडेकर, शासकीय लेखापरीक्षक दिनेश कोळी, अष्टविनायक पतसंस्थेचे संस्थापक जयराम पवार, अध्यक्ष विलास चौलकर, उपाध्यक्ष महादेवसिंग परदेशी, सचिव प्रफुल्ल नागोठणेकर, खजिनदार रतन हेंडे आदींसह सर्व संचालक, सभासद, अनेक मान्यवर व सत्कारमूर्ती यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री अष्टविनायक पतसंस्थेच्या वार्षिक सभेचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थी व उल्लेखनीय कार्य केलेल्या सपोनि सचिन कुलकर्णी, पोलिस शिपाई स्वप्नील भालेराव, नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष सखाराम ताडकर, प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, मराठी महिला व्यावसायिक सुजाता नांदगावकर, चार्टर्ड अकाउंटंट ओमकार शिर्के, ॲड. किरण जाधव यांच्यासह अनेक व्यक्तींचा व विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या सभेत संचालक रोहिदास हातनोलकर यांनी वार्षिक अहवालाचे, सचिव प्रफुल्ल नागोठणेकर यांनी नफा – तोटा पत्रकाचे तर उपाध्यक्ष महादेवसिंग परदेशी यांनी अंदाज पत्रकाचे वाचन केले.

याच सभेत मार्गदर्शन करतांना गिरीश तुळपुळे यांनी संस्थेच्या कारभाराचे कौतुक करून सहकार हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने सभासदांनी नेहमी जागरूक राहिले पाहिजे असे सांगितले. सपोनि सचिन कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात बचत ही काळाची गरज असली तरी पैसे कुठे गुंतवायचे याचा अभ्यास ज्याला आहे तो सुखी असे सांगतानाच अनेक पतसंस्था डबघाईला येऊन संचालकांवर गुन्हे दाखल होत असतांनाच अष्टविनायक पतसंस्था चांगले काम करीत असल्याबद्दल सचिन कुलकर्णी यांनी विलास चौलकर व टीमचे अभिनंदन केले. यावेळी शरद वाडेकर व दिनेश कोळी यांनीही अभ्यासपूर्ण माहिती देत सभासदांना मार्गदर्शन केले.

या संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संचालक रोहिदास हातनोलकर यांनी केले. ही सभा यशस्वी होण्यासाठी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका शैला घासे व सर्व कर्मचारी, पिग्मी एजंट यांनी सहकार्य केले.





