धार्मिक सोहळामनोरंजनमहाराष्ट्र ग्रामीणसांस्कृतिक
इस्कॉन तर्फे नागोठण्यात कृष्ण जन्माष्टमी आनंदोत्सव सोहळा संपन्न
आराधना भवन मध्ये धार्मिक कार्यक्रमांनी रंगत

इस्कॉन तर्फे नागोठण्यात कृष्ण जन्माष्टमी आनंदोत्सव सोहळा संपन्न
आराधना भवन मध्ये धार्मिक कार्यक्रमांनी रंगत
महेश पवार
नागोठणे : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या नागोठणे सत्संग द्वारा आयोजित आणि श्री महाप्रभू निमाई दास मंगेश बारस्कर यांचे मार्गदर्शनाखाली नागोठण्यातील आराधना भवन येथे रविवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेला कृष्ण जन्माष्टमी आनंदोत्सव सोहळा मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात आणि उत्साहात संपन्न झाला. चौपाटी मुंबई येथील इस्कॉन केंद्रातील प्रमुख श्रीकृष्ण गौर प्रभू व श्री सत्यनारायण प्रभू हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नागोठण्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या कृष्ण जन्माष्टमी आनंदोत्सव सोहळ्याची सुरुवात
दुपारी २.३० वाजता आराधना भवन येथून निघालेल्या हरिनाम संकीर्तन धार्मिक फेरीने झाली. नंतर ही फेरी नागोठण्यातील प्रभू आळी, ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ मधून पुन्हा आराधना भवन मध्ये नेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ४.३० ते ५.३० वा. दरम्यान भक्तांच्या हस्ते श्री राधाकृष्ण मूर्तींवर महाअभिषेक, ५.३० ते ६.३० वा. दरम्यान भगवान श्री राधाकृष्ण यांच्यावर आधारित नृत्य – नाटके, ६.३० ते ७.३० वा. दरम्यान हरिनाम संकीर्तन आणि श्री कृष्ण गौर प्रभुजी द्वारा कृष्ण कथा, शृंगार दर्शन, ५६ भोग आदी धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर महाआरती घेण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

हा धार्मिक सोहळा उत्साहात व यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी इस्कॉन नागोठणे केंद्राचे अनिरुद्ध जाधव, शंकर भालेकर, अमित कोपर्डे, ओमकार तेलंगे, आकाश राऊत, सिद्धेश तेलंगे, रुपेश कदम आदींसह सर्व भक्तगणांनी सहकार्य केले. दरम्यान इस्कॉन, नागोठणे तर्फे ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिरात प्रत्येक महिन्याच्या पहील्या रविवारी सायंकाळी ७.१५ ते ९.३० वाजता सत्संग कार्यक्रम घेण्यात येत असल्याने भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.




