अपघातनिधनमहाराष्ट्र ग्रामीण

मुंबई गोवा महामार्गावर पुगाव गावच्या हद्दीतील अपघातात तरुणीचा मृत्यू 

ऐनवहाळ गावावर शोककळा 

मुंबई गोवा महामार्गावर पुगाव गावच्या हद्दीतील अपघातात तरुणीचा मृत्यू 
ऐनवहाळ गावावर शोककळा 
नागोठणे : मुंबई गोवा महामार्गावर पुगाव गावच्या हद्दीत असलेल्या नम्रता ढाबा समोर एस टी बसने स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने स्कुटी चालक तरुणी कुमारी देवयानी किशोर गोळे (वय १९) रा. ऐनवहाळ (ता.रोहा) हिच्या डोक्याला व शरीराला गंभीर जखमा झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात स्कुटीवर मागे बसलेला या तरुणीचा भाऊ सुजल किशोर गोळे (वय १५)  जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.१) दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला.  पनवेल येथील सीकेटी कॉलेज मध्ये बी एम एस चे शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या या तरुणीचा ऐन गणेशोत्सवाच्या काळात मृत्यू झाल्याने ऐनवहाळ गावावर शोककळा पसरली आहे.
या अपघाता संदर्भात उपलब्ध माहितीनुसार आजचे गौरीपुजन उरकल्या नंतर अपघातामधील मृत तरुणी तिचा प्रथमच गौरीचा ओवसा असल्याने आपल्या मामाकडे देवकान्हे येथे ओवसा देण्यासाठी आपल्या ऐनवहाळ गावातून मुंबई गोवा महामार्गावरून चालली होती. त्याचवेळी खेड डेपोच्या व खेडवरून मुंबईकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या भरधाव एस टी बसने स्कुटीला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातानंतर मृत तरुणीचे पार्थिव नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. यावेळी ऐनवहाळ गावातील तरुण व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या अपघातामधील एस टी बसचा चालक जितेंद्र अवसरमल याला ताब्यात घेण्यात आले आहे. या अपघाताची नोंद कोलाड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून याप्रकरणी कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. आबा गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!