धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीणसांस्कृतिक

नागोठणे परिसरातील लाडक्या बाप्पांना व माहेरवाशीण गौरींना भक्तिमय वातावरणात निरोप 

नागोठणे पोलिसांचा सर्व विसर्जन स्थळी चोख बंदोबस्त 

नागोठणे परिसरातील लाडक्या बाप्पांना व माहेरवाशीण गौरींना भक्तिमय वातावरणात निरोप 

नागोठणे पोलिसांचा सर्व विसर्जन स्थळी चोख बंदोबस्त 
अनिल पवार 
नागोठणे : “ गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या “, “ गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला “ असा जयघोष करीत नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील नागोठणे शहर व परिसरांतील पाच दिवसांच्या सुमारे १०८० खासगी व रिलायन्स टाऊनशीप, कातळावाडी व पिंपळवाडी येथील ३ सार्वजनिक गणपती बाप्पांना तसेच माहेरवासीन असलेल्या १७५ गौरींना मंगळवारी (दि.०२) अतिशय भक्तिमय वातावरणात मनोभावे भावपूर्ण निरोप देण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागोठणेसह संपूर्ण विभागात गौरी गणपती सण पारंपारिक पद्धतीने अतिशय भक्तिमय आणि तितक्याच उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी दुपारनंतर सुरू झालेला गौरी गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळ्यात यावेळी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागोठणे शहर व परिसरातील ग्रामीण भागातील गणेश भक्तांनी अधिकाधिक जल्लोष आणि आनंद लुटला.  नागोठणे शहर व परिसरातील सर्व विसर्जन स्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच उत्साहाच्या, आनंदाच्या क्षणी कोणताही गालबोट लागू नये, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी नागोठणे शहर व परिसरात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नागोठणे शहर व ग्रामीण भागात आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी नागोठणे शहर व परिसरातील विसर्जन स्थळी सायंकाळी चार वाजल्यापासूनच सुरु झालेला विसर्जन सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. गणेश भक्तांवर कृपादृष्टी ठेवून अधूनमधून हजेरी लावणाऱ्या वरुन राजाने विश्रांती घेतल्याने नागोठणे शहरात तसेच ग्रामीण भागात गणेश भक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे गौरी गणपती विसर्जन मिरवणूक यावेळी दिसून आले.
वरुन राजाची घेतलेल्या विश्रांतीचा फायदा घेत नागोठणे शहर व परिसरांत ग्रामीण भागातील गणेश भक्तांकडून पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात वाजत, गाजत, नाचत तसेच फटाक्यांची आतषबाजी करून बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. नागोठणे परिसरात सर्वच ठिकाणी पारंपारिक पध्दतीने मिरवणूक काढून गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला. यावेळी नागोठणे शहरांत आपल्या लाडक्या बाप्पांना कुणी सजविलेल्या हातगाडीवर, कुणी कारमध्ये तर कुणी टेंपोत सामूहिकरित्या नागोठणे शहरातील अंबा नदी किनारील विसर्जन घाटावर आणून निरोप दिला. 
नागोठणे ग्रामपंचायत प्रशासना कडून येथील अंबा घाट या विसर्जन ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई संजय महाडिक यांच्यासह सदस्या पूनम प्रथमेश काळे, शबाना आसिफ मुल्ला आदींसह ग्रामपंचायतीचे वरिष्ठ कर्मचारी दिलीप तेलंगे, संतोष जोशी, विनोद घासे, राजेंद्र नागोठणेकर, सफाई कामगार उपस्थित होते. तसेच अंबा नदी घाट विसर्जन स्थळी जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बाप्पांच्या विसर्जनासाठी नागोठणे ग्रामपंचायतीकडून तीन ते चार नागरिकांना उपलब्ध ठेवण्यात आले होते.
नागोठणे व परिसरांत गणेश भक्तांनी तलावात व अंबा नदीच्या पात्रात यावेळी गौरी गणपती बाप्पांचे विसर्जन करत भावपूर्ण निरोप दिला. नागोठणे शहरातील खडकआळीसह जोगेश्वरी नगर, आंगरआळी, केएमजी विभाग व इतर आळीतील काही गणेश भक्तांनी श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिरासमोरील तलावात, शृंगार तलावात तर काही गणेश भक्तांनी अंबा नदीवरील विसर्जन घाटावर बाप्पांचे विसर्जन करुन भावपूर्ण निरोप दिला. नागोठणे विभागातील गावागावांतील गणेश भक्तांनी सायंकाळी गौरी गणपती बाप्पांचे विसर्जन केले तर नागोठणे शहारतील अंबा घाटावर रात्री उशिरा पर्यंत बााप्पांचे विसर्जन सुरु होते. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!