निधनमहाराष्ट्र ग्रामीण
सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ दिवेकर यांचे निधन
रायगड पोलिस दलातर्फे श्रद्धांजली

सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ दिवेकर यांचे निधन
रायगड पोलिस दलातर्फे श्रद्धांजली
महेश पवार
नागोठणे : महाराष्ट्र पोलिस दलाच्या रायगड गुन्हे अन्वेषण विभागातून पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले नागोठण्याचे सुपुत्र तसेच नागोठण्यातील नाभिक समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते गोपीनाथ उर्फ बाळा नथुराम दिवेकर (वय ७९) यांचे शनिवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी जयश्री दिवेकर, विवाहित मुलगी उन्नती चव्हाण, विवाहित मुलगे पवन (राजा) दिवेकर, जगदीश दिवेकर, जावई, सुना, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. दिवंगत गोपीनाथ दिवेकर यांच्या पार्थिवावर नागोठण्यातील अंबा घाटावरील वैंकुठ स्मशानभूमीत शनिवारीच सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दिवेकर यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, सगे – सोयरे, नागोठणे शहर व विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागोठण्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवृत्त पोलिस अधिकारी गोपीनाथ दिवेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार नागोठणे पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनी दिवेकर यांच्या निवासस्थानी येऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दिवंगत निवृत्त पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ दिवेकर यांना रायगड पोलिस दलातर्फे उपस्थित पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली.
दिवंगत गोपीनाथ दिवेकर रायगड पोलिस दलात प्रथम पनवेल पोलिस ठाण्यात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी अलिबाग, महाड, कर्जत, नेरळ, खालापूर या पोलिस ठाण्यात काम केले. खालापूर येथे सतत १२ वर्षे सेवा बजावत असतांनाच त्यांना पोलिस खात्यात बढती मिळून पोलिस दलाचा आत्मा समजल्या जाणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागात बेलापूर – नवी मुंबई कार्यालयांतर्गत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या संधीचेही त्यांनी सोने केले. आपल्या शिस्तप्रिय व कडक स्वभावामुळे त्यांनी आपल्या सेवाकाळात विविध पोलिस ठाण्यात काम करतांना सर्वोत्तम कामगिरी केली होती. अध्यात्माची आवड असल्याने दिवंगत गोपीनाथ दिवेकर यांनी सेवानिवृत्तीनंतर आपल्या निवासस्थानी समर्थांचे अधिष्ठान घेऊन रेवदंडा येथील श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या सांप्रदायाच्या श्री सदस्यांची बैठक सुरू केली. त्यानंतर आपल्या निवासस्थानी त्यांनी बाल उपासनाही सुरू केली. त्यामुळे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग समाजात असल्याने गोपीनाथ दिवेकर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दिवंगत गोपीनाथ दिवेकर यांचे दशक्रिया विधी सोमवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी उद्धर – पाली येथे तर उत्तरकार्य गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी नागोठणे पोस्ट ऑफिस शेजारील त्यांच्या निवासस्थानी होणार असल्याचे दिवेकर कुटुंबियांकडून सांगण्यात आले.





