सर्वसामान्यांना उभे करणे हेच श्री जोगेश्वरी पतसंस्थेचे ध्येय : किशोरभाई जैन
सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

सर्वसामान्यांना उभे करणे हेच श्री जोगेश्वरी पतसंस्थेचे ध्येय : किशोरभाई जैन
सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर
महेश पवार
नागोठणे : श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेच्या वाटेत अनेक ससे आले, धावले, दमले आणि थांबले मात्र आमच्या पतसंस्थेने कुणाशीही स्पर्धा न करता कासवाच्या चालीने चाल केल्यानेच यश मिळविले. संस्थेचे संचालक, सभासद, ठेवीदार यांच्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन आत्महत्येचा विचार डोक्यात आलेल्या एका कारागिर व्यक्तीला कर्ज देऊन सावरण्याचे काम आम्ही केले. ग्रामदेवतेच्या नावाने ही पतसंस्था असल्याने संस्थेत कोणतेही वाद नाही, निवडणूक बिनविरोध होते तसेच राजकारणातही आम्हाला यश मिळत आहे. पतसंस्थेच्या संचालकांनी कधीच चुकीच्या लोकांना कर्ज देण्यासाठी शिफारस केली नाही. हातावर कमविणाऱ्या लोकांना ५० लाख कर्ज देणाऱ्या बँकांची गरज नसते. त्यांना २५–५० हजार तातडीचे कर्ज देणाऱ्या पतसंस्थेची गरज आम्ही पूर्ण केली. त्यामुळेच सर्वसामान्यांना उभे करणे हेच श्री जोगेश्वरी पतसंस्थेचे ध्येय असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष किशोरशेठ जैन यांनी केले व सभासदांना यावेळी १० टक्के लाभांशही जाहीर केला.
नागोठण्यातील नावाजलेल्या श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील शिवगणेश सभागृहात रविवारी (दि. ७) सायंकाळी उत्साहात संपन्न झाली त्यावेळी किशोरशेठ जैन बोलत होते. यावेळी किशोरशेठ जैन यांच्यासह उपाध्यक्ष प्रकाश (घिसूशेठ) जैन, नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक, शिवसेना नागोठणे विभाग प्रमुख संजय भोसले, दैनिक सामनाचे उपसंपादक राजेश पोवळे, पतसंस्थेचे सचिव संजय काकडे, संचालक डॉ. मिलिंद धात्रक, रितेश दोशी, राजकुमार जैन, मोहन नागोठणेकर, विजया परमार, कल्पना टेमकर, दीपिका गायकवाड, नागोठणे ग्रामपंचायतीच्या सदस्या शबाना मुल्ला, व्यवस्थापक सुनील नावले आदींसह अनेक मान्यवर व सभासद यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

सुरूवातीस संस्थेचे सचिव संजय काकडे यांनी आपल्या प्रास्ताविकात किशोर जैन यांच्या नेतृत्वाखाली नागोठणेकरांनी नागोठण्यासाठी उभी केलेल्या या संस्थेच्या यशोगाथा सांगितली व वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रक याचे वाचन केले. उपाध्यक्ष प्रकाश जैन यांनी संस्थेत ठेवलेल्या ठेवी आम्ही विश्वासाने सुरक्षित ठेवत असल्याचे सांगून कर्जदारांसाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा ५ लाखांचा विमा काढणार असल्याचे जाहीर केले. यावेळी व्यवस्थापक सुनील नावले यांनी इतिवृत्ताचे वचन केले. या वार्षिक सभेच्या निमित्ताने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण झालेला कु. ओंकार भालचंद्र शिर्के,
नागोठण्यातील प्रथम फिजिओथेरपिस्ट डॉ. कुमारी काव्या मिलिंद टेमकर, लायन्स क्लब झोनल अध्यक्ष विवेक सुभेकर, नागोठणे लायन्स क्लब अध्यक्ष सखाराम ताडकर, वर्षा जांबेकर यांच्यासह अन्य व्यक्तींचा सत्कारही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ही सभा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक सुनील नावले व सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.




