खेळमहाराष्ट्र ग्रामीण
तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत एस.पी. जैन ज्युनिअर कॉलेजच्या मुला – मुलींची बाजी
दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत एस.पी. जैन ज्युनिअर कॉलेजच्या मुला – मुलींची बाजी
दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
महेश पवार
नागोठणे : ज्या स्पर्धेतून खेळाडू स्थानिक पातळीवर सहभाग घेऊन पुढील जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी पात्र ठरतात आणि उज्ज्वल भविष्य मिळवितात, अशाच प्रकारच्या रोहा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २६ व २७ सप्टेंबर रोजी सानेगाव आश्रम शाळा येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेतील १९ वर्षीय वयोगटात कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलातील श्रीमती गुलाबबाई रामनिवास अग्रवाल विद्यामंदिर व कै. एस. पी. जैन ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघाने अंतिम विजेतेपद पटकावले. मुलांच्या संघाने द.ग. तटकरे कनिष्ठ महाविद्यालय, कोलाड या संघाचा तर मुलींच्या संघाने सानेगाव आश्रम शाळेच्या संघाचा अंतिम सामन्यात पराभव करून हे घवघवीत यश मिळविले. या दोन्ही संघांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हा स्तरावर निवड झालेल्या दोन्ही संघातील सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे संकुलातील शाळा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन, प्रभारी प्राचार्य डी. एम. पवार, वरिष्ठ लेखनिक संतोष गोळे, सकाळ सत्र प्रमुख नेताजी गायकवाड, दुपार सत्र प्रमुख रमेश जेडगे, स्टाफ सेक्रेटरी शिंदे सर यांनी अभिनंदन केले. तर या यशात शिक्षक अनिल तिरमळे, शिक्षक प्रतिनिधी अबेसिंग गावित, क्रीडा विभाग प्रमुख पवन पाटील, मिसाळ सर, इरनक सर, शिक्षिका सौ. सविता गोळे मॅडम, सौ. सुतार मॅडम तसेच सर्व सेवक वृंद यांचे सहकार्य लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे संकुलाच्या वतीने कौतुक करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.




