महाराष्ट्र ग्रामीणराजकारण
भाजपाच्या उमेदवारांची घोषणा
सोपान जांबेकर, पल्लवी मढवी व सुषमा वाघमारे असणार उमेदवार

जिल्हा परिषद नागोठणे गट व रोहा पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची घोषणा
सोपानभाऊ जांबेकर, पल्लवी मढवी व सुषमा वाघमारे असणार उमेदवार
महेश पवार
नागोठणे : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे असले तरी उमेदवार निश्चित करण्यात भाजपाने आघाडी घेतली असून रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे गटासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सोपनभाऊ जांबेकर तर रोहा पंचायत समितीच्या नागोठणे गणासाठी भाजपा महिला मोर्चा जिल्हा चिटणीस पल्लवी निखिल मढवी व सुकेळी गणासाठी सुषमा निमेष वाघमारे यांच्या नावाची घोषणा भाजपाच्या नागोठणे मंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा परिषद व रोहा पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे इच्छुक उमेदवार निश्चित करून त्यांची घोषणा करण्याच्या आणि निवडणूक पूर्वतयारी सुरू व्हावी या उद्देशाने नागोठणे मंडळाची बैठक मंडळ अध्यक्ष महेश ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंटे यांच्या निवासस्थानी बुधवारी (दि.१५) घेण्यात आली. महायुतीचा जो काही निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील तो अंतिम आदेश असेल. परंतु जिल्हा परिषदेचा नागोठणे गटाचा उमेदवार हा भाजपचाच असेल असा सूर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांमधून उमटला. त्यानुसार भाजपच्या नागोठणे मंडळाचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

नागोठणे जिल्हा परिषद उमेदवार हा सर्वसाधारण प्रवर्गाचा असल्यामुळे या जागेवर भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून गेली २१ वर्षे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रथम राष्ट्र मग पार्टी आणि शेवटी स्वतः या तत्त्वावर तन मन आणि धन अर्पून अविरत काम करणारे, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संघटित करून सर्वांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे, आजपर्यंत अनेक संकटांवर मात करत पक्षामध्ये स्वकर्तृत्वावर आढळ पद निर्माण केलेले, आजपर्यंत केलेली पक्ष बांधणीचे काम असेल अथवा पक्ष वाढीचा काम असेल कायम वरिष्ठांकडून ज्यांची पाठ कौतुकाने थोपटली गेलेले, पक्ष श्रेष्ठी सांगतील तिकडे वाऱ्यासारखे फिरून सतत पार्टी साठी समर्पित भावनेने काम करीत असताना अवघा महाराष्ट्र पिंजून काढलेले, आणि दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि संपुर्ण जिल्ह्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत दांडगा जनसंपर्क असलेले, विभागातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यात मदतीचा हात कायम पुढे करणारे सोपानभाऊ जांबेकर यांच्या नावाची घोषणा सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने केली. त्यामुळे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात वेगळाच जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण बैठकीत दिसून आले.

त्याचवेळी नागोठणे पंचायत समितीच्या आरक्षणात ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्यामुळे या जागेसाठी नागोठणे मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष निखिल मढवी यांच्या सौभाग्यवती पल्लवी निखिल मढवी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
तसेच सुकेळी पंचायत समिती साठी अनु. सुचित जमाती आरक्षण जाहीर झाल्याने तिथे सुषमा निमेश वाघमारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
यावेळी दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपानभाऊ जांबेकर, नागोठणे मंडळ अध्यक्ष महेश ठाकुर, जिल्हा उपाध्यक्षा श्रेयाताई कुंटे, तालुका सरचिटणीस आनंदभाई लाड, तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, युवा मोर्चा नागोठणे मंडळ अध्यक्ष निखिल मढवी, तालुका महिला मोर्चा अध्यक्ष अपर्णा सुटे, तालुका उपाध्यक्ष संतोष लाड, तालुका यु. मो. सरचिटणीस मोरेश्वर म्हात्रे, उपाध्यक्ष प्रमोद नागोठणेकर, तालुका क्रीडा संयोजक शेखर गोळे, तालुका शिक्षक सेल अध्यक्ष अशोक अहिरे, विभागीय अध्यक्ष ज्ञानदेव शिर्के, निमेश वाघमारे, संतोष रेवाळे, विवेक रावकर, विठोबा माळी, धनराज उमाळे, गणेश घाग, प्रियांका पिंपळे, मिना माने आदी पदाधिकारी, बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सोपानभाऊ जांबेकर यांच्या नावाची घोषणा होताच सर्वांनी आपले १०० टक्के योगदान द्यावे अशी भावनिक साद मंडळ अध्यक्ष महेश ठाकुर यांनी घातली. यावेळी सरचिटणीस आनंद लाड यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी लगेच आपापल्या बूथ वर काम करण्याची सूचना सर्व बूथ अध्यक्ष यांना केली. युवा मोर्चा अध्यक्ष निखिल मढवी यांनी युवा मोर्चा पुर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल आणि विजयाचा गुलाल आपलाच असेल अशी जणू काही निवडणूक जिंकण्याची खात्रीच दिली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर यावेळी वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. शेवटी गणेश घाग यांनी जिल्हापरिषद आणि पंचायत समिती उमेदवारांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले.




