धार्मिक सोहळामनोरंजनमहाराष्ट्र ग्रामीणसांस्कृतिक
मेघ पोटेच्या बासरीवादन कलेने नागोठणेकर भारावले
दस-या निमित्त श्री जोगेश्वरी मंदिरात कार्यक्रम

कु. मेघ पोटेच्या बासरी वादन कलेने नागोठणेकर भारावले
दस-या निमित्त श्री जोगेश्वरी मंदिरात कार्यक्रम
महेश पवार
नागोठणे : नागोठणे शहरातील मराठा आळीतील रहिवासी, उत्तम बासरी वादक तसेच “कान्हा फ्लूट्स” या बासरी वाद्याचे निर्माते निलेश पोटे यांचे चिरंजीव मास्टर, कु.मेघ निलेश पोटे याने दस-या निमित्त ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिरात सादर केलेल्या बासरी वादनाच्या कार्यक्रमाने उपस्थित नागोठणेकर भारावून गेले. सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे एक तास बासरी वादनाची कला विविध प्रकारे सादर करतांना कु. मेघ याने उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर, सचिव विवेक देशपांडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन ठोंबरे, आनंद लाड, शेखर गोळे बाळाराम पोटे, निलेश पोटे, नरेश भंडारे आदींसह उत्सव समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

या बासरीवादन कार्यक्रमाची सुरुवात कुमार मेघ याने शास्त्रीय संगीतातीलराग हंसध्वनी ने केली. त्यानंतर सुंदर ते ध्यान, कन्नड भजन सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा असे एकाहून एक सरस अभंगे कुमार मेघ याने बासरी वादनाने सादर करून या बासरी वादनाचा शेवट भैरवी रागातिल स्वामी कृपा कधी करणार याने केली. कु. मेघ याच्या बासरी वादनाला सुहान बाईत व कौस्तुभ दिवेकर यांनी तबला वादनाची तर नागोठणे आंगर आळीतील कु. रणवीर नरेश भंडारे याने टाळ वादनाची साथ दिली. या संपूर्ण बासरी वादन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक प्रवीण धाडसे यांनी केले.

जगप्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य असलेले जगप्रसिद्ध बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी यांचा सर्वात छोटा व आवडता शिष्य असलेल्या अकरा वर्षीय कु. मेघ याने यापूर्वी कोर इन्स्टिट्युट ऑफ म्युझिक, कँनडा आयोजित आंतरराष्ट्रीय आॅनलाईन संगीत स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधित्व करतांना तब्बल २०० स्पर्धकांधून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. एप्रिल, २०२३ मध्ये त्याने बेंगलोर स्थित एका इंटरनॅशनल कंपनीला त्यांच्या जिंगल साठी स्वतः म्युझिक कंपोज करून दिली आहे. आतापर्यंत त्याने अनेक नाटकांमध्ये “बाल कृष्ण” बनून बासरी वाजविली आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्येही कुमार मेघ याने बासरी वादन केलेले आहे. महाराष्ट्र बाहेर बडोद्यात साधारण दहा हजार प्रेक्षकांसमोर समोर देखील त्याने आपले बासरी वादन केलेल आहे. “मित्र फाउंडेशन” पुणे तर्फे दिनांक २६ नोव्हेंबर, २०२३ रोजी मेघ याला “मित्र फाउंडेशनचे” संस्थापक धनंजय गोखले यांच्यावतीने ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश सामंत यांच्या हस्ते २०२३-२४ ची बासरी वादनासाठी स्कॉलरशिप देण्यात आली आहे. अशा लहान वयात प्रसिद्धीस आलेल्या कुमार मेघ याचे सर्वत्र कौतुक होत आहे.




