धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण
आई आकादेवी मातेचा २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पुन: प्राण प्रतिष्ठापना सोहळा
मंदिरात तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

आई आकादेवी मातेचा २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पुन: प्राण प्रतिष्ठापना सोहळा
मंदिरात तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
महेश पवार
नागोठणे : नागोठण्याजवळील शेतपळस (ता. रोहा) येथील आराध्य ग्रामदेवता श्री आकादेवी मातेच्या पुन: प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे भव्य आयोजन शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर ते रविवार दिनांक ३० नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. यानिमित्त श्री आकादेवी मातेच्या मंदिरात तीन दिवस विविध धार्मिक व संस्कृतिक अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आई आकादेवी मातेच्या या पुन: प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याची सुरुवात शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ग्राम प्रदक्षिणा कलश मिरवणुकीने होणार आहे. शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता गणेश पुजन झाल्यानंतर पुण्याहवन, विविध देवतांची स्थापना, स्नान, होमहवन, निद्रावास आदी धार्मिक कार्यक्रम दिवसभर होणार आहेत. त्यानंतर रविवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान होमहवन, पूर्णाहुती आशिर्वाद, महा नैवैद्य, आरती हे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान ३० नोव्हेंबर रोजीच दुपारी १२.२९ वाजण्याच्या शुभ मुहूर्तावर आई आकादेवी मातेच्या मूर्तीची पुन: प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. या धार्मिक सोहळ्याचे पौरोहित्य नाना वेखंडे स्मृती संस्थान, कासू, मुरबाड येथील वेदमूर्ती पंढरीनाथ यशवंत मंडलिक आणि ब्रह्मवृंद सहकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे.

श्री आकादेवी मंदिरात तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्या निमित्त दररोज सायंकाळी ५ ते ७ वाजता हरिपाठ तर रात्री ७ ते ९ वाजता कीर्तन सेवा होणार आहे. तीन दिवसांच्या या हरिपाठ व कीर्तन सोहळ्यात शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी हरिपाठ मंडळ, किल्ला यांचा हरिपाठ व ह. भ. प. संजय महाराज साळवी (चिपळूण) यांचे कीर्तन होणार आहे. शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी विठ्ठल रुक्मिणी हरिपाठ मंडळ, जांबोशी यांचा हरिपाठ व युवा कीर्तनकार ह. भ. प. विनीत महाराज म्हात्रे(सोनारपाडा – डोंबिवली) यांचे कीर्तन होणार आहे. तर रविवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी संत ज्ञानेश्वर हरिपाठ मंडळ, चोळे यांचा हरिपाठ व राष्ट्रीय युवा कीर्तनकार ह. भ.प. ऋतिका दीदी कदम (झी मराठी फेमस) मुळखेड पुणे यांचे कीर्तन होणार आहे. याशिवाय रोज रात्री भजन व जागरण होणार आहे.

आई आकादेवी मातेचा हा पुन: प्राण प्रतिष्ठापना सोहळा यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे मार्गदर्शक ह. भ. प. मारुती महाराज कोलाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद डाकी, उपाध्यक्ष नीलेश डाकी, सुभाष डाकी, संकेत डाकी, मयूर डाकी, शिवाजी घासे, योगेश डाकी, रूपेश चंदने, मनोज डाकी, संतोष माळी, कार्याध्यक्ष रुपेश डाकी, सचिव राहुल डाकी, खजिनदार शैलेश घासे, सहखजिनदार विकास डाकी, सल्लागारकिरण डाकी, विश्वास डाकी, रमण डाकी, गणपत डाकी, भास्कर डाकी, सखाराम माळी, लक्ष्मण डाकी, सुनील डाकी, रविंद्र डाकी, वामन डाकी, सर्व सदस्य व ग्रामस्थ आणि महिला मंडळ मेहनत घेत आहेत.




