महाराष्ट्र ग्रामीणराजकारणवाहतूक
सहा कोटींच्या रस्त्याची मंजुरी हे येड्या गबाळ्याचे काम नाही : आमदार रवीशेठ पाटील
गांधे फाटा ते बोरावाडी रस्त्याचे आ. रविशेठ पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

सहा कोटींच्या रस्त्याची मंजुरी हे येड्या गबाळ्याचे काम नाही : आमदार रवीशेठ पाटील
गांधे फाटा ते बोरावाडी रस्त्याचे आ. रविशेठ पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
महेश पवार
नागोठणे : शिहू भागातील बोरावाडी हे गाव मला नवीन नाही. या गावावर माझे पूर्वीपासून प्रेम असल्यानेच या गावात मंत्री असताना २००४ साली ठक्कर बाप्पा योजेपासून येथील आदिवासी बांधवांसाठी असलेल्या खावटी वाटप, गॅस, गाई – म्हैशी, बकऱ्या आदींचे वाटप अशा अनेक योजना राबविल्या. वीजपुरवठा, आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्यामधून बोरवाडीतील तरुण जोडप्यांची लग्ने असे जे काही करता येईल ते करून या गावाला मी झुकते माप दिले. मंत्री असताना या रस्त्याचे खडीकरण मी केले. मात्र दर्जेदार टिकाऊ रस्ता करण्याची इच्छा असल्यानेच मुख्यमंत्री सडक योजनेतून बोरावाडी रस्त्यासाठी ६ कोटींचा निधी मी मंजूर करून घेतला. असे असतानाच येथील एक पुढारी मी रस्ता मंजूर केला असे सांगत फिरत असल्याने सहा कोटींचा रस्ता मंजूर करणे हे येड्यागबळ्याचे काम नाही असा टोला यावेळी आमदार रवीशेठ पाटील यांनी विरोधकांना लगावला.

पेण तालुक्यातील शिहू विभागातील गांधेफाटा ते बोरावाडी या ३.९ किलोमीटरच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार रवीशेठ पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि.२) दुपारी गांधे फाटा येथे संपन्न झाला त्यावेळी रविशेठ पाटील बोलत होते. यावेळी भाजपाचे युवा नेते ललितशेठ पाटील, भाजपा पेण तालुका उपाध्यक्ष वसंत मोकल, प्रफुल्ल पाटील, लक्ष्मण जांभळे, पांडुरंग गदमले, प्रफुल्ल म्हात्रे, प्रमोद कुथे, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष गंगाराम मेंगाळ, चंद्रकांत फसाळे, यशवंत घासे, के. के. कुथे, पांडुरंग लोभी, नामदेव लेंडी, देवजी लेंडी, कांग्या गडखळ, धर्मा गडखळ, मच्छिंद्र लोभी, प्रमोद लोभी, पोशा लोभी, भास्कर मांगे, राजेश गदमले, संदीप ठाकूर, राहुल ठाकूर, नागेश लोभी, नामदेव लोभी, मधुकर लेंडी, मच्छिंद्र लेंडी, धनुर्धन लेंडी आदींसह बोरावाडी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उप अभियंता आर.डी. खेडकर यांनी बोरावाडीच्या मंजूर रस्त्याची तांत्रिक माहिती दिली. तर लक्ष्मण जांभळे यांनीही यावेळी मार्गदर्श केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले. यावेळी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

अनेक वर्षे रखडलेल्या गांधे फाटा ते बोरावाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाल्याने आता पाऊस कमी होताच येत्या काही दिवसांतच बोरावाडी गावापासून या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू होणार असल्याने बोरावाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी आमदार रवीशेठ पाटील यांचे आभार मानले आहेत.





