निधनमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण
काकासाहेब माने यांचे वृद्धापकाळाने निधन
नागोठण्यासह विभागात सर्वत्र हळहळ

नागोठण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब माने यांचे वृद्धापकाळाने निधन
नागोठण्यासह विभागात सर्वत्र हळहळ
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा नाभिक समाजातील ज्येष्ठ नेते सदानंद धोंडू उर्फ काकासाहेब माने (वय ८९) यांचे नागोठण्यातील त्यांच्या राहत्या घरी सोमवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दिवंगत काकासाहेब माने यांच्या पार्थिवावर अंबा घाटावरील वैंकुठ स्मशानभूमीत सोमवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी नागोठणे शहर व विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर, माने परिवारातील सगेसोयरे, आप्तेष्ट, यांच्यासह नागोठणे शहर व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवंगत काकासाहेब माने यांच्या पश्चात पुत्र राजेंद्र माने, पत्रकार महेंद्र माने, रोह्याच्या नवनिर्वाचित नगरसेविका असलेल्या कन्या सुप्रिया जाधव, कन्या प्रतिक्षा साळुंखे (डोंबिवली), जावई, सुना पल्लवी, नम्रता, नातू ऋत्वीज, संकल्प, उदित, शार्दुल तसेच पतवंडे, पुतणे यांच्यासह मोठा परिवार आहे. काकासाहेब यांच्या जाण्याने माने परिवारासह नागोठणे विभागात दुःखाचे सावट पसरले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. दिवंगत काकासाहेब माने यांचे दशक्रिया विधी बुधवार दिनांक ७ जानेवारी रोजी तर उत्तरकार्य शुक्रवार दिनांक ९ जानेवारी रोजी नागोठण्यातील त्यांच्या निवासस्थानी होणार असल्याचे माने कुटुंबियांकडून सांगण्यात आले.
सदानंद माने हे नागोठणे विभागात “काका साहेब” या नावाने ओळखले जायचे, माने हे काही काळ नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य होते त्या काळात नागोठणे शहरातील जनतेसाठी त्यांनी सामाजिक कार्याची गुढी उभारली. तसेच ते शेतकरी कामगार पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. १९८० च्या काळात त्यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर (भाऊ) पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून शेकापचा “लाल बावटा” गावोगावी पोहचविण्याचे कार्य केले.




