किशोर जैन यांचा उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र
शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचेही राजीनामा सत्र सुरू

किशोर जैन यांचा उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र
शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचेही राजीनामा सत्र सुरू
महेश पवार
नागोठणे : शिवसेना उबाठाचे रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख आणि नागोठणे ग्रामपंचायतीमधील किंग मेकर अशी ओळख निर्माण केलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोर जैन यांनी आपल्या जिल्हा सहसंपर्क प्रमुख आणि शिवसेनाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सोमवार दिनांक २९ डिसेंबर रोजी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देत शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. दरम्यान किशोर जैन यांनी राजीनामा देताच नागोठणे शहर व विभागातील शिवसैनिकांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. किशोर जैन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची दाट शक्यता खास सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नागोठणे शहर व विभागातील राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात किशोर जैन यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या धोरणाप्रती व विचारधारेप्रती माझी निष्ठा सदैव राहिलेली आहे. पक्षाने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. मात्र काही वैयक्तिक कारणामुळे मी सध्या पक्षाच्या संघटनात्मक कार्यात अपेक्षित वेळ देऊ शकत नाही. म्हणून मी माझ्या रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख या पदाचा स्वेच्छेने राजीनामा देत आहे. तसेच मी प्राथमिक शिवसैनिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे. मला पक्षाच्या या पदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा मी शतशः ऋणी आहे. कृपया माझा हा राजीनामा मान्य करण्यात यावा असेही किशोर जैन यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
किशोर जैन यांच्या राजीनाम्यापाठोपाठ उबाठा शिवसेनेचे रोहा उपतालुका प्रमुख गणपत लक्ष्मण म्हात्रे, नागोठणे विभाग प्रमुख संजय भोसले व नागोठणे शाखा प्रमुख धनंजय जगताप त्यांच्याकडून आपल्या पदाचे व शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागोठणे शहर व विभागातील उबाठा शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गळती होणार असल्याने येत्या निवडणुकीसाठी रंगतदार चित्र निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.




