पाले येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन

पाले येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन
महेश पवार
नागोठणे : समस्त माऊली वारकरी सांप्रदायिक मंडळ, मेढा विभाग पंचक्रोशी यांच्या सौजन्याने मेढा विभागातील पाले तर्फे अष्टमी (ता.रोहा) गावातील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन सोमवार दि.२९ डिसेंबर, २०२५ ते गुरुवार दि.१ जानेवारी, २०२६ या चार दिवसांत करण्यात आले आहे. परमपुज्य स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य गणपतबाबा अलिबागकर महाराज व स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य गोपाळ महाराज वाजे, परमपूज्य स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य धोंडुबाबा कोल्हटकर तसेच गुरूवर्य पुरुषोत्तम महाराज पाटील (बापु) यांच्या कृपाशीर्वादाने तसेच ग्रामस्थ मंडळ पाले तर्फे अष्टमी यांच्या सौजन्याने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या चार दिवसांमध्ये दररोज काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायणाचे वाचन, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, रात्री ९ वा. किर्तन असे कार्यक्रम होणार आहेत. पाले गावातील या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात २९ डिसेंबर रोजी सकाळी ग्रामस्थ अर्जुन खांडेकर, खेळू खांडेकर व संदेश खांडेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून होणार आहे. त्यानंतर कलश पूजन मधुकर खांडेकर व ह. भ. प. सुदाम खांडेकर यांच्या हस्ते आणि ध्वजारोहण माजी उपसरपंच विकेश खांडेकर व सदस्या अपर्णा खांडेकर यांच्या हस्ते आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी ह. भ. प. लिलाधर खरीवले(भातसई) यांचे प्रवचन व ह. भ. प. गुरुवर्य नारायणदादा वाजे, मठाधिपती पंढरपूर यांचे कीर्तन, मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी ह. भ. प. उदयमहाराज बंद्री (खारगाव) यांचे प्रवचन तर ह. भ. प. विकास महाराज बोराडे (डोंबिवली) यांचे कीर्तन, बुधवार दि. ३१ डिसेंबर रोजी ह. भ. प. दिनेश महाराज कडव (बांदोली) यांचे प्रवचन आणि ह. भ. प. नित्यानंद महाराज मांडवकर (सुडकोली – चणेरा) यांचे कीर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे गुरुवार दि.१ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह. भ.प. डॉ. मारुती महाराज कोल्हटकर (तळवली) यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर दुपारी १२ ते २ वा. दरम्यान दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद देऊन या भव्यदिव्य कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह सोहोळा उत्साहात साजरा करण्यासाठी पाले तर्फे अष्टमी गावातील ग्रामस्थ व महिला मंडळ, जय भवानी युवक मंडळ पाले तर्फे अष्टमी मेहनत घेत आहेत.




