कायदेविषयकमहाराष्ट्र ग्रामीण

रोहा न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद

५५ लाख ५ हजार १५० रुपयांची वसुली 

रोहा न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद

५५ लाख ५ हजार १५० रुपयांची वसुली 

दोन जोडप्यांचा वाद तडजोडीने मिटला 

महेश पवार

नागोठणे : रोहा न्यायालयातील लोक अदालतीमध्ये दाखल व वादपूर्व प्रकरणे ठेवून ती तडजोडीने मिटविण्याचे आवाहन पक्षकारांना करण्यात आले होते. त्यास पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिल्याने एकूण २५९३ प्रकरणांपैकी  १२५९  प्रकरण सामंजस्याने व तडजोडीने मिटवून निकाली काढण्यात आली.  त्यामधून एकूण ५५ लाख, ५ हजार, १५० रुपयांची वसुली झाल्याने रोहातील लोक अदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले. तसेच या लोक अदालतीमध्ये दोन  जोडप्यांचा वैवाहिक जीवनातील वाद तडजोडीने मिटविण्यात आल्याने त्यांच्या संसाररुपी वेलीवरील फुल पुन्हा एकदा फुलल्याचे पहावयास मिळाले. या जोडप्यांचा सत्कार न्यायाधीश एस. व्ही. खैरे यांच्या हस्ते गुलाब पुष्पाचे रोपटे देऊन करण्यात आला.

रोहा येथील कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयात १३ डिसेंबरला संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी प्रलंबित असलेल्या १६०१  खटल्यांपैकी ३०५ खटल्यांतून १४७ खटले तडजोडीने निकालात काढण्यात आली. यामधून ५३  लाख ८  हजार, ४५१ रुपये एवढी रक्कम तडजोडीअंती जमा झाली. तसेच या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या दाखलपूर्व वाद खटले म्हणजेच रोहा नगरपरिषद, तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, बीएसएनएल, एमएसईबी यांच्याकडील एकत्रित २२८८  प्रकरणांपैकी १११२ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात येवून त्यामधून ४९ लाख, ६६ हजार, ६९९ रुपये रक्कम वसूल करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई., जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अलिबाग-रायगड यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगडचे अध्यक्ष राजेंद्र  सावंत आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगडच्या सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून रोहा तालुका विधी सेवा समिती मार्फत रोहा येथील कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित केलेल्या या राष्ट्रीय लोक अदालतीचे  उद्घाटन रोहा न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोहा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. नानासाहेब देशमुख, पंच म्हणून ॲड. शिवानी संतोष साळुंखे व इतर वकील उपस्थित होते. रोह्यातील या लोक अदालतीमध्ये रोहा नगरपरिषदेचे अधिकारी, ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, बीएसएनएल, एमएसईबीचे प्रतिनिधी आदींसह पक्षकार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी रोहा न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!