कायदेविषयकगुन्हेगारी वृत्तमहाराष्ट्र ग्रामीण
भांडणाचा राग मनात ठेवून हत्या केल्या प्रकरणी आरोपी राहुल वाघमारे दोषी
नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांची साक्ष ठरली महत्वाची

भांडणाचा राग मनात ठेवून हत्या केल्या प्रकरणी आरोपी राहुल वाघमारे दोषी : आठ वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा
नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांची साक्ष ठरली महत्वाची
महेश पवार
नागोठणे : भांडणाचा राग मनात धरून अजय संतोष वाघमारे याची हत्या केल्या प्रकरणाच्या खटल्यात (अलिबाग पोलिस ठाणे सीआर नं. १०८/२०२४ व अलिबाग सेशन केस नंबर २०/२०२४) आरोपी राहुल उदय वाघमारे यास अलिबाग येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आर.डी. सावंत यांनी दिनांक ५ जानेवारी, २०२६ रोजी दिलेल्या महत्वपूर्ण निकालांतर्गत आरोपीस भारतीय दंड विधान कलम ३०४ (२) नुसार दोषी ठरवून आठ वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे.
हत्येची ही घटना अलिबाग तालुक्यातील मौजे बुरुमखान आदिवासी वाडी, वरसोली या गावाच्या हद्दीत एप्रिल, २०२४ मध्ये घडली होती. याप्रकरणी त्यावेळी अलिबाग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले तपासकीय अधिकारी व सध्या नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन कुलकर्णी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक २२ एप्रिल, २०२४ रोजी रात्री आठ वाजण्याची सुमारास मौजे बुरुमखान आदिवासी वाडी (ता. अलिबाग) या गावाच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्यातील फिर्यादी अर्चना अजय वाघमारे यांचे सासरे संतोष बाळू वाघमारे व आरोपी राहुल वाघमारे यांच्यामध्ये शाब्दिक वाद होऊन भांडण झाले होते. सदरचे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचे पती अजय संतोष वाघमारे हे गेले असता आरोपी राहुल वाघमारे याने संतोष वाघमारे यांचा गळा दोन्ही हाताने पकडून त्यांना खाली पाडून त्यांच्या अंगावर बसून गळा दोन्ही हाताने जोराने आवळून पोटावर आणि छातीवर गुडघ्याने मारून फिर्यादी यांचे पती संतोष वाघमारे यांना जिवानिशी ठार मारले होते. त्यानंतर फिर्यादी अर्चना वाघमारे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राहुल वाघमारे याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी त्यावेळी अलिबाग पोलिस ठाण्यात व सध्या नागोठणे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले प्रभारी अधिकारी, सपोनि सचिन कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जलद गतीने तपास पूर्ण करून मोलाचे सहकार्य केले होते. या प्रकरणात शासकीय अभियोक्ता संतोष पवार यांनी एकूण १२ साक्षीदार तपासून दमदार युक्तिवाद केला. यामध्ये फिर्यादी, साक्षीदार व तपासकीय अधिकारी असलेले सपोनि सचिन कुलकर्णी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच याप्रकरणी पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुनील डोंगरे, पैरवी कर्मचारी पो. ह. सचिन खैरनार, पो.ह. प्रवीण पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.




