महाराष्ट्र ग्रामीणराजकारण

ज्यांच्याकडे नरेंद्रजी व देवेंद्रजी आहेत त्यांना कुणाशी युती करण्याची गरज नाही

रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होणार

ज्यांच्याकडे नरेंद्रजी व देवेंद्रजी आहेत त्यांना कुणाशी युती करण्याची गरज नाही : खासदार धैर्यशीलदादा पाटील 

रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होणार
विभागातील कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश 
महेश पवार 
नागोठणे : महायुतीमध्ये केंद्र सरकार असो व राज्य सरकार भाजपाने मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. ज्यांना ही भूमिका मान्य नसेल आणि जर ते मीशिला पिळ देत असतील तर स्वबळावर लढण्याची हिंमत भाजपामध्ये आहे. पेणमधील पाचच्या पाच जागा आम्ही दणकून आणणार आहोत. सुधागड मध्ये आमच्या विरोधात तीन पक्षांना एकत्र येण्याची वेळ आली तरीही सुधागड मधील दोनही जागा निवडून आणणार आहोत. आता वेळ रोहा नागोठण्याची आहे. येथील जनताही हुशार असल्याने या उमेदवारांना निवडून आणण्याची माझी जबाबदारी आहे. भाजपा सरकारने राज्यात व केंद्रात अनेक  लोकोपयोगी योजना राबविल्या असल्याने आणि ज्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्रजी आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत त्यांना कुणाशीही युती करण्याची गरज नाही असा स्पष्ट इशारा देत रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होणार असा ठाम विश्वास  भाजपाचे राज्यसभेतील खासदार धैर्यशीलदादा पाटील यांनी नागोठण्याच्या निर्धार मेळाव्यात व्यक्त केला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने कडसुरे, ऐनघर पंचक्रोशी, नागोठणे रामनगर, बाळसई येथील मोठ्या संख्येने  कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला त्यांचे खा. धैर्यशीलदादा पाटील यांनी पक्षात स्वागत केले.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा नागोठणे विभागीय निर्धार मेळावा चिकणी येथे शुक्रवारी (दि.२) सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला भाजपाचे रायगड जिल्हा महामंत्री सतीश धारप, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठशेठ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सोपानभाऊ जांबेकर, जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, ज्येष्ठ नेते मारुती देवरे, महादेव मोहिते, अनंत वाघ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नीलेश थोरे, नागोठणे मंडळ तालुका अध्यक्ष महेश ठाकूर, गणपत म्हात्रे, रोहा तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, तालुका सरचिटणीस आनंद लाड, युवा मोर्चा नागोठणे मंडळ तालुका अध्यक्ष निखिल मढवी, सिराज पानसरे, ज्ञानेश्वर शिर्के, शेखर गोळे, गणेश घाग, प्रमोद नागोठणेकर, गौतम जैन, पल्लवी मढवी, संज्योती लाड आदींसह भाजपा बूथ पदाधिकारी, विभागातील कार्यकर्ते व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
(कडसुरे येथील युवा कार्यकर्ते सागर शिर्के यांना भाजपा युवा मोर्चा नागोठणे मंडळ अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देताना खा. धैर्यशीलदादा पाटील)
वैकुंठदादा पाटील त्यांच्या मनोगतात म्हणाले की, रविशेठ पाटील मंत्री असताना या भागात वाडी वस्त्यांवर रस्ते व इतर अनेक योजना राबविल्या. याच नागोठण्याने माझी आई कौसल्या पाटील यांना जिल्हा परिषदेत पाठविले. येथील कंपन्यांचा सी एस आर वापरला तर या भागात नंदनवन फुलू शकते. आमच्या परिसरातील ज्येएसडब्लू कंपनीत परिसरातील तरुणांना मोठ्या संख्येने नोकरी मिळाली आहे. मात्र येथील रिलायन्स मध्ये किती स्थानिक तरुण नोकरीला आहेत हा प्रश्न असून भविष्यात रिलायन्सच्या नवीन प्रकल्पात येथील तरुणांना आमच्याकडून नोकरी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
सोपान जांबेकर यांनी आपल्या मनोगतात राज्य व केंद्र सरकारकडून राबविण्यात आलेल्या अनेक योजनांची माहिती देऊन नागोठणे विभागातील मतदान केंद्रातील भाजपला मिळू शकणाऱ्या मतांचा आढावा सादर केला आणि कार्यकर्त्यांनी वाकायला शिकले पाहिजे असे बोलून श्रेष्ठी सांगतील ती पूर्व दिशा समजून आम्ही संपूर्ण ताकदीनिशी तयार आहोत असे स्पष्ट केले. सभेचे प्रास्ताविक महेश ठाकूर यांनी केले. 
या निर्धार मेळाव्यात मारुती देवरे, श्रेया कुंटे, निलेश थोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन गणेश घाग व प्रमोद नागोठणेकर यांनी केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!