नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बिबट्या विषयक जनजागृती
चारशे विद्यार्थांनी व शिक्षकांनी घेतला लाभ

नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बिबट्या विषयक जनजागृती
चारशे विद्यार्थांनी व शिक्षकांनी घेतला लाभ
महेश पवार
नागोठणे : महाराष्ट्र राज्य शासनाच्या नागोठण्यातील मुंबई गोवा महामार्ग लगत असलेल्या राज्य शासनाच्या आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागोठणे या संस्थेच्या मागील बाजूस असलेल्या झाडी झुडपातील परिसरात बिबट्या आल्याची माहिती चुकीची व बिनबुडाची ठरलेली घटना ताजी आहे. या पार्श्वभूमीवर वन खात्याच्या नागोठणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयामार्फत नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी बिबट्या विषयक जनजागृती कार्यक्रम रोहा येथील सागर दहिंबेकर यांच्या रेस्क्यू टीमकडून संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी घेण्यात आला.
वन खात्याच्या नागोठणे वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दुपारी साडेबारा वाजता व एक तासभर घेण्यात आलेल्या या बिबट्या विषयक जनजागृती कार्यक्रमात रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांच्या वतीने रेस्क्यू टीमचे सागर दहिंबेकर यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांना बिबट्या विषयक महत्त्वपूर्ण माहिती देऊन बिबट्या हा आपला काही दुश्मन नाही किंवा बिबट्याचे आपण दुश्मन नाही. बिबट्या हा उगीचच कोणावर हल्ला करीत नाही अशा प्रकारची विविध बहुपयोगी माहिती एल सी डी स्क्रीनवर देऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. यावेळी वन खात्याच्या नागोठणे बीटचे वनरक्षक मधुकर सोनावणे, वासगाव बीटचे वनरक्षक अर्जुन जारवाल यांच्यासह नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी, गटनिदेशक व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी नागोठणे आयटीआय कॉलेज परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी दिसून आल्याची माहिती समोर आल्याने नागोठणे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वनविभाग, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी जाऊन सखोल तपासणी केली.
तपासणी दरम्यान त्या ठिकाणी बिबट्याशी संबंधित कोणतीही हालचाल अथवा पायांचे ठसे आढळून आले नाहीत. तथापि, या घटनेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करणे व योग्य माहिती देण्याच्या उद्देशाने नागोठण्यातील आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांना तसेच प्रशिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांना बिबट्याबाबत आवश्यक माहिती, खबरदारी व सुरक्षितते संदर्भात हा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.




