शांतीनगर भागाची ताकद मतपेटीत दिसू द्या : किशोरशेठ जैन
शांतीनगर भागात सर्वात जास्त मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार

शांतीनगर भागाची ताकद मतपेटीत दिसू द्या : किशोरशेठ जैन
शांतीनगर भागात सर्वात जास्त मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
महेश पवार
नागोठणे : खासदार सुनील तटकरे साहेब केंद्रात आहेत, राज्यात आहेत आणि जिल्ह्यातही असल्यानेच मी राष्ट्रवादीत जाण्याच्या निर्णय घेतला. खासदार तटकरे साहेबांचे हात अधिकाधिक मजबूत करण्यासाठी मी काम करणार आहे. नागोठण्यातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये हायवेनाका, जोगेश्वरी नगर, रामनगर या भागाचा समावेश असला तरी शांतीनगर या मध्यवर्ती भागात या प्रभागातील साठ टक्के मतदान आहे. अनेक ठिकाणचे लोक स्थायिक होऊन येथे गुण्यागोविंदाने राहत आहेत. या भागातील मतदार हे उच्चशिक्षित असून येथे केवळ गणिते न मांडता कागदावरचे आकडे महत्वाचे असून येथील एक एक मत आपल्याला बाहेर काढायचे आहे. त्यामुळे नागोठण्यातील प्रभाग क्रमांक ६ मधील ताकद मतपेटीत दिसू द्या असे आवाहन राजिपच्या नागोठणे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार किशोरशेठ जैन यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रोहा पंचायत समितीचे माजी सदस्य हरीश काळे यांच्या निवासस्थानी शांतीनगर भागातील प्रमुख व्यक्ती व कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना किशोरशेठ जैन बोलत होते. या बैठकीला राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, हरीश काळे, बाबूशेठ मोदी, नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, संजय काकडे, बिपीन सोष्टे, रुचिर मोरे, दत्ताराम झोलगे, शैलेश रावकर, ज्ञानेश्वर साळुंखे, निम्याशेठ मोदी, मंदार चितळे, नितीन पत्की, बाळा पाटील, विजय शहासने, म्हात्रे तात्या, सिद्धेश काळे, मंदार चितळे, राजू सुतार, जगदीश दिवेकर, अंकुश ताडकर, मंदार मोरे आदींसह शांतीनगर भागातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीलाच संजय काकडे यांनी शांतीनगर भागात बैठक घेण्यासंदर्भात पार्श्वभूमी सांगितली. तर ज्येष्ठ नेते हरीश काळे यांनी येथील मतदारांशी आपले घरोघरी व कौटुंबिक संबंध असल्याने येथे आपल्याला भरभरून मते मिळतील याची खात्री दिली. तर शैलेश रावकर यांनी या प्रभागात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेली ताकद एकत्र झाल्याने आपली निशाणी असलेल्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटांची वेळ असली तरी या निवडणुकीत विरोधकांचे बारा वाजवायचे असल्याचे स्पष्ट केले.




