निधनमहाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक
विठोबा खाडे (गुरुजी) यांचे अल्पशा आजाराने निधन
नागोठणे परिसरात हळहळ व्यक्त

विठोबा खाडे (गुरुजी) यांचे अल्पशा आजाराने निधन
नागोठणे विभागातील शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी सूर्याचा अंत
नागोठणे परिसरात हळहळ व्यक्त
महेश पवार
नागोठणे : नागोठण्याजवळील वणी गावातील रहिवासी आणि राजिपचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक ह. भ. प.श्री. विठोबा धोंडू खाडे (गुरूजी) यांचे गुरुवार दिनांक ८ जानेवारी रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने नागोठणे विभागातील शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी सूर्याचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. दिवंगत खाडे गुरुजी यांच्या पार्थिवावर वणी येथील वैकुंठ स्मशानभूमीत गुरुवारीच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खाडे यांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार, नागोठणे विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर, वणी गावातील ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात उच्च शिक्षित तीन विवाहित मुलगे मनोज, प्रदीपकुमार, चंद्रशेखर, एक विवाहित मुलगी
सौ. पुजा पांडुरंग शिंदे, सुना, रिलायन्स इंडस्ट्रीज मधील नामवंत उद्योजक जावई पांडुरंग शिंदे, डॉक्टर असलेली एक नात, आय. टी. क्षेत्रात उच्च पदवी घेतलेल्या दोन नाती, एम. बी. ए. केलेली एक नात, इतर शिक्षण घेणाऱ्या दोन नाती व एक नातू यांच्यासह मोठा आदर्श परिवार आहे.
दिवंगत विठोबा खाडे कुटुंबात गुरुजींचा १९४३ साली झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असताना देखील गुरुजी शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षक बनले.
दि.१७/०१/१९६४ पासून गुरुजींनी आपल्या शिक्षकी पेशाला सुरुवात केली. सेवेच्या ३८ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या रोहा तालुक्यातील नागोठणे नं १, म्हसळा तालुक्यातील तळवडे, कांदळवाडा, कर्जत तालुक्यातील खांडस, जांबरूग, सुधागड तालुक्यातील गोंडाळे या शाळांमध्ये ज्ञानदानाचे पवित्र काम केले व सन २००१ साली रोहा तालुक्यातील वाघळी या शाळेत ते सेवानिवृत्त झाले. परमार्थ क्षेत्राची आवड असलेल्या गुरुजींनी संगीत भजनात एक काळ गाजवला होता. त्याचबरोबर ग्रंथ वाचनात त्यांचा हातखंडा होता. सुंदर लेखणी, कामातील काटेकोरपणा, योग्य सल्ला व प्रबोधन करणारे मार्गदर्शक अशी गुरुजींची ओळख होती. तसेच ४७ वर्षापूर्वी त्यांनी वणी गावातील अखंड हरिनाम सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवली होती.
समाजातील अनेक विद्यार्थ्यांना घडवत असताना खाडे गुरुजी यांनी स्वतःच्या चारही मुलांना उच्च शिक्षण दिले व समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण नागोठणे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिवंगत विठोबा खाडे गुरुजी यांचे दशक्रिया विधी शनिवार दिनांक १७ जानेवारी रोजी वणी येथे तर उत्तरकार्य मंगळवार दिनांक २० जानेवारी रोजी पाटणसई येथील बाळाराम हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या मोरया होम टाऊन येथील बिल्डिंग नं. १ मधील खाडे कुटुंबाच्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती खाडे कुटुंबियांकडून देण्यात आली.




