निवडणूकमहाराष्ट्र ग्रामीणराजकारण
नागोठण्याच्या विकासासाठी पंचवीस वर्षाचा राजकीय संघर्ष विसरून आम्ही दोन भाऊ एकत्र आलो : नरेंद्रशेठ जैन
नरेंद्रशेठ जैन यांनी व्यक्त केला किशोरशेठ जैन यांच्या विजयाचा विश्वास

नागोठण्याच्या विकासासाठी पंचवीस वर्षाचा राजकीय संघर्ष विसरून आम्ही दोन भाऊ एकत्र आलो : नरेंद्रशेठ जैन
नरेंद्रशेठ जैन यांनी व्यक्त केला किशोरशेठ जैन यांच्या विजयाचा विश्वास
रायगडचा बुलंद आवाज टीम
नागोठणे : नागोठण्याच्या राजकारणातील माझा व किशोर जैन यांच्या संघर्षामुळे गावाच्या विकासाला कुठेतरी अडथळा निर्माण होताना दिसत होता परंतु आता नागोठण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचा पंचवीस वर्षाचा राजकीय संघर्ष विसरून आम्ही लहान मोठे भावंड एकत्र आलेलो आहोत. कोणालाही चिंता करण्याची गरज नाही. कोणाला काय वाटत असेल, कोणाच्या मनात काय शंका आहेत त्या मनातून काढून टाका. आम्ही दोन भाऊ एकत्र आलेलो आहोत आता विजय आपलाच आहे असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेंद्रशेठ जैन यांनी व्यक्त केला.

नागोठणे जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार किशोरभाई जैन व नागोठणे पंचायत समिती गणाच्या उमेदवार समृद्धी संतोष कोळी यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. ४) रात्री नागोठणे केएमजी (कुंभार आळी, मराठा आळी, गवळ आळी) विभागात घेण्यात आलेल्या सभेच्या वेळी नरेंद्रशेठ जैन बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते नरेंद्रशेठ जैन यांच्या समवेत नेते भाई टके, उमेदवार किशोरभाई जैन, समृद्धी कोळी, शिवरामभाऊ शिंदे, नागोठण्याच्या सरपंच सुप्रिया महाडिक, भाजप जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, माजी सरपंच विलास चौलकर, डॉ. मिलिंद धात्रक, राष्ट्रवादी विभागीय अध्यक्ष संतोष कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, संजय भोसले, माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, सुनिल लाड, ग्रामपंचायत सदस्य संतोष नागोठणेकर, चंद्रकांत गायकवाड, लियाकतशेठ कडवेकर, घिसुशेठ जैन, भाजप नेते आनंद लाड, अपर्णा सुटे, गणेश घाग यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

किशोरभाई जैन मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपले विरोधी उमेदवार जिल्हा परिषदच्या माध्यमातून ठेका घेऊन जी कामे येतात ती मिळवून कामात जेवढा भ्रष्टाचार करता येईल तेवढा करायचा आणि हे सर्व दडपवुन टाकण्यासाठी निवडणूक लढवायची हा त्यांचा धंदा आहे. मी लोकांना पायाभूत सुविधा देण्याचा, मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण देण्याचा आणि लोकांच्या संकटात उभे राहण्याचा ठेका घेतो असे शेवटी किशोरभाई जैन यांनी सांगितले. या सभेमधील केएमजी विभागातील ग्रामस्थांचा सहभाग बघून या विभागात किशोरभाई जैन यांना मोठे मताधिक्य मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे.




