महाराष्ट्र ग्रामीण
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचे काम जिंदाल स्कूल करीत आहे : शिवकुमार सिंघल
जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचे काम जिंदाल स्कूल करीत आहे : शिवकुमार सिंघल
जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
महेश पवार
नागोठणे : जिंदाल समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून २०११ मध्ये १२० विद्यार्थ्यांसह सुरू केलेल्या जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलने गेल्या १४ वर्षात दर्जेदार शिक्षणासह सर्वच बाबतीत चांगली प्रगती केली आहे. जिंदल शाळेत शासनाच्या धोरणानुसार आर. टी. ई. अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तसेच स्थानिक ऐनघर ग्रामपंचायतीच्या मार्फत पाच गरीब गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. याशिवाय नागोठणे, पाली, रोहा, माणगाव, कोलाड आदी परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही माफक फी मध्ये शिक्षण दिले जात आहे

असे असूनही शाळेच्या चांगल्या शिक्षकांकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचे काम जिंदाल स्कूल करीत असल्याचे प्रतिपादन जिंदल ग्रुपचे कमर्शियल डायरेक्टर शिवकुमार सिंघल यांनी जिंदल स्कूलच्या “उत्सव” व “भारत देशाचे दर्शन” ही थीम घेऊन आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण प्रसंगी केले. शाळेतील हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांमुळे यावर्षी शाळेच्या नावलौकिकात अधिक भर पडल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संपन्न झालेल्या या वार्षिक स्नेहसंमेलनास शिवकुमार सिंघल यांच्यासह जिंदलचे कमर्शियल हेड संजीव बॅनर्जी, टेक्निकल प्रेसिडेंट मुकेश दुबे, फायनान्सचे व्हाईस प्रेसिडेंट आर. के. खंडेलवाल, लायझनिंग हेड के.के. पांडे, झी लर्निग स्कूलचे बिजनेस हेड विकास श्रीवास्तव, क्षेत्रीय व्यापार व्यवस्थापिका श्रीमती-स्नेहल भालेकर, जिंदाल स्कूलच्या प्राचार्य लिली रॉय, उपप्राचार्य स्वागतिका साहू, प्रशासकीय अधिकारी कमलाशंकर सिंग आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. टेक्निकल प्रेसिडेंट मुकेश दुबे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.