Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण
नागोठणे लायन्स क्लब तर्फे नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न

नागोठणे लायन्स क्लब तर्फे नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न
६२ नागरिकांनी घेतला लाभ
मोतीबिंदू आढळलेल्या १४ रुग्णांवर शस्त्रक्रिया
महेश पवार
नागोठणे : ‘मोतिबिंदू मुक्त रोहा तालुका अभियान ‘ अंतर्गत लायन्स क्लब नागोठणे तर्फे आर झुनझुनवाला – शंकरा आय हॉस्पीटल, पनवेल यांच्या सहकार्याने गेली तीन वर्ष हे स्तुत्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत स्वर्गिय सुलेखा यशवंत चित्रे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पाचव्या स्मृती दिना निमीत्त एम.जे.एफ लायन यशवंत चित्रे यांच्या सौजन्याने बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर येथील शांतीनगर भागातील स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यानात आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन लायन्स क्लब डायमंड, अलिबाग च्या सेक्रेटरी, लायन ॲड. अंकिता पाटील यांचे हस्ते तसेच शिक्षण विभागाचे डिस्ट्रिक्ट चेअरमन, एम.जे.एफ लायन यशवंत चित्रे, नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन सुनिल कुथे, झोन चेअरमन, एम.जे.एफ लायन विवेक सुभेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी लायन यशवंत चित्रे यांनी लायन्स क्लबच्या वतीने कु. अथर्व गजानन सवादकर या होतकरु विद्यार्थ्याला त्याच्या उज्वल भविष्यासाठी लॅपटॉप भेट दिला. लहानपणापासुन चित्रकलेची आवड असलेल्या आपल्या मुलाला त्याच्या आईवडीलांनी स्वतःची हौस मौज बाजुला ठेवून त्याला चित्रकला क्षेत्रात शिक्षण देवून मोठे केले. आज त्याने चित्रकलेमध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहे. हे लक्षात घेवून त्याची पुढची गरज कोणती याचा विचार करून लायन यशवंत चित्रे यांनी लॅपटॉप देवून त्याचा सन्मान केला. यावेळी त्याचे आईवडील गजानन सवादकर व गितांजली सवादकर यांचाही सन्मान शाल श्रीफळ पुष्प देवून करण्यात आला.
या नेत्रचिकित्सा शिबिरात ६२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामधे मोतिबिंदू आढळलेल्या १४ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी त्वरीत पनवेल येथे नेण्यात आले व त्यांच्या डोळ्यांतील मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
या शिबिरास नागोठण्याचे माजी सरपंच लायन विलास चौलकर, उपाध्यक्ष लायन संतोष शहासने, उपाध्यक्ष लायन विशाल शिंदे, सेक्रेटरी लायन डॉ.अनिल गिते, ट्रेझरर लायन दिपक गायकवाड, एम.जे.एफ लायन सुधाकर जवके, लायन दौलत मोदी, लायन सुजाता जवके, लायन विवेक करडे, लायन दिपक लोणारी, लायन जयराम पवार सर, लायन वरद उपाध्ये, लायन श्वेता चौलकर यासोबत श्री. अष्टविनायक सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी महादेवसिंग परदेशी, रोहीदास हातनोलकर, व्यवस्थापिका शैला घासे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात डोळ्याची काळजी कशी काय घ्यावी यावर लायन डॉ. अनिल गिते यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन एम.जे.एफ लायन विवेक सुभेकर यांनी केले.