महाराष्ट्र ग्रामीण
श्री पळसाई मातेच्या मूर्तींची पुर्नप्राणप्रतिष्ठापना व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
श्री पळसाई मातेच्या मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक

श्री पळसाई मातेच्या मूर्तींची पुर्नप्राणप्रतिष्ठापना व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
श्री पळसाई मातेच्या मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक
महेश पवार
नागोठणे : नागोठणे विभागातील पळस येथील आराध्य ग्रामदेवता व सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री पळसाई मातेच्या मूर्तींची पुर्नप्राणप्रतिष्ठापना सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह दिनांक ८ ते ११ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री पळसाई मातेच्या मूर्तींची पुर्नप्राणप्रतिष्ठापना १० फेब्रुवारीस कासू येथील पुरोहित किरणदादा वेखंडे यांच्याकडून होणाऱ्या मंगलविधीद्वारे करण्यात आली.

यानिमित्ताने श्री पळसाई मातेच्या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजनही करण्यात आले होते. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या ९ व्या व १२ व्या अध्यायाचे सामुदायिक पारायण व अखंड नामजपानुष्ठान यज्ञही या सोहळ्यात करण्यात आला.
श्री पळसाई माता मंदिरातील या धार्मिक सोहळ्याची सुरुवात शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री. व सौ. शिवरामभाऊ शिंदे यांच्या हस्ते कलश स्थापनेने करण्यात आली. या अखंड हरिनाम सोहळ्यात तीन दिवस दररोज सायंकाळी ७ वाजता झालेल्या कीर्तन सेवेत भागवताचार्य ह. भ. प. श्री. भागवत महाराज नकाते (परळी – बीड), संत साहित्य अभ्यासक ह. भ. प. आशाताई अक्षय हनमघर, पुणे, संस्कृत मूर्ती ह. भ. प. श्री. हरिदास महाराज पालवे शास्त्री, आळंदी यांची कीर्तन सेवा झाली.
रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी श्री पळसाई मातेच्या मूर्तीची मंगलमय वातावरणात, ढोल ताशांच्या गजरात आणि नामघोषाने ग्रामप्रदक्षिणा व भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर श्री पळसाई मातेच्या मंदिरामध्ये विविध देवतांची स्थापना होऊन गणेशपूजन, स्वस्तिवाचन, पुण्याहवाचन होऊन नंतर देवीची स्नानविधी, होमहवन, जलाधिवास आणि निद्रावास आदी धार्मिक विधी झाले.

सोमवार दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३५ वा. च्या. शुभमुहूर्तावर श्री पळसाई मातेच्या मूर्तींची पुर्नप्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर होमहवन विधी, मूर्ती पुजा, नैवेद्य व नंतर आरती झाली. नंतर सायंकाळी ह. भ. प. गुरुप्रसाद महाराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपोत्सव संपन्न झाले. त्यानंतर मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ह. भ. प. विजयानंद महाराज तेलंगे (वाण्याची तळवळी) यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसादाने या धार्मिक सोहळ्याचा समारोप झाला. या धार्मिक सोहळ्यात दररोज सकाळी काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, रात्री हरि जागर आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. श्री पळसाई मातेच्या मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी श्री पळसाई माता देवस्थान समिती, ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ, पळस यांनी मोलाचे सहकार्य केले.