महाराष्ट्र ग्रामीण
भाजपाच्या नागोठणे कार्यालयात शिवजयंती साजरी
भाजपाच्या नागोठणे कार्यालयात शिवजयंती साजरी
नागोठणे : ज्यांच्या अतुलनीय पराक्रमाने भारतभूमी पवित्र झाली व सुमारे तीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या रात्रीनंतर महाराष्ट्र भूमीवर स्वराज्याचा उष:काल झाला तसेच ज्यांनी त्यांची दूरदृष्टी वापरून असीम धैर्य, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन, प्रबळ इच्छाशक्ती व आपल्या मुत्सद्दी आणि प्रभावी व्यक्तिमत्वाच्या बळावर सार्वभौम हिंदू राष्ट्राची निर्मिती केली असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भारतीय जनता पार्टीच्या नागोठणे येथील मोदी पार्क मधील कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या या मध्यवर्ती कार्यालयात श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ. श्रेया कुंटे, रोहा तालुका महामंत्री आनंद लाड, नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, रोहा तालुका क्रीडा संयोजक शेखर गोळे, रोहा तालुका शिक्षण सेलचे उपाध्यक्ष धनराज उमाळे, भाजपाचे वरिष्ठ कार्यकर्ते व अल्पसंख्यांक समाजाचे नेते सिराज पानसरे, ज्येष्ठ कार्यकर्ते विवेक रावकर, उत्तर भारतीय सेलच्या नागोठणे शहर महिला अध्यक्ष सौ. सोनी पांडे, प्रकाश मेस्त्री आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.