महाराष्ट्र ग्रामीण
महाराष्ट्र सिमलेस कंपनीच्या मिळकतीची संयुक्त फेरमोजणी ७ मार्च रोजी
रोहा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांचे आदेश

महाराष्ट्र सिमलेस कंपनीच्या मिळकतीची संयुक्त फेरमोजणी ७ मार्च रोजी
रोहा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांचे आदेश
ऐनघर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अर्चना भोसले यांच्या पाठपुराव्याला यश
महेश पवार
नागोठणे : ऐनघर ग्रामपंचायतीच्या कर आकारणी समितीच्या अध्यक्ष तथा विद्यमान सरपंच कलावती राजेंद्र कोकळे व उपाध्यक्ष तथा उपसरपंच भगवान शिद यांच्या गैरहजेरीमुळे १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी रद्द झालेली सुकेळी येथील महाराष्ट्र सिमलेस कंपनीच्या मिळकतीची संयुक्तिक फेरमोजणी प्रक्रिया आता ७ मार्च रोजी सुरू होणार आहे. महाराष्ट्र सिमलेस कंपनीच्या मिळकतीची संयुक्तिक फेरमोजणी घेण्याविषयीचे लेखी आदेश रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी कर आकारणी समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांना पाठविल्याने ऐनघर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अर्चना सचिन भोसले यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे बोलले जात आहे.
नागोठण्याजवळील पाईपनगर, सुकेळी येथील महाराष्ट्र सिमलेस लि. या कंपनीच्या करा संदर्भात दिनांक ९ डिसेंबर, २०२४ रोजी राजिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं) यांचे दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं) यांनी सदर कंपनीचे करा संदर्भात कंपनीचे प्रतिनिधी आणि ऐनघर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांनी सदर कंपनीच्या मिळकतीची संयुक्तिक फेरमोजणी करून कर आकारणी करण्यात यावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ऐनघर ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच अर्चना भोसले यांच्या अध्यक्षतेखालील कर आकारणी समितीने १ जानेवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र सिमलेस लि. या कंपनीच्या प्रतिनिधींच्या समवेत महाराष्ट्र सिमलेस कंपनीच्या मिळकतीची संयुक्तिक फेर मोजणी करण्याबाबत व त्याप्रमाणे कर आकारणी करण्याची कार्यवाही करण्याबाबत कळविले होते.

याच दरम्यान कंपनीच्या मिळकतीची फेरमोजणी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नसल्याचे कारण पुढे करून महाराष्ट्र सिमलेस कंपनीच्या वतीने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ३० डिसेंबर, २०२४ च्या पत्रान्वये फेरमोजणी करण्यासाठी वाढीव कालावधीची मागणी करीत नियोजित मोजणीच्या तारखेत बदल करण्याची विनंती केली होती. त्यानुसार रजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी, २०२५ मधील दुसऱ्या दुसऱ्या आठवड्यात मोजणीची तारीख निश्चित करण्याच्या लेखी सूचना दिल्या होत्या. तसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं) यांनाही कळविले होते. याचदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या २९ जानेवारीच्या आदेशाने अर्चना भोसले यांना अपात्र ठरविल्याने त्यांचे सरपंचपद गेले. नंतर १२ फेब्रुवारी रोजी निर्धारित कर मोजणीच्या दिवशी कर आकारणी समितीचे अध्यक्ष तथा विद्यमान सरपंच कलावती कोकळे व उपाध्यक्ष तथा उपसरपंच भगवान शिद गैरहजर राहिल्याने मोजणी संदर्भातील कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नव्हती तसा अहवालही समिती मधील अधिकाऱ्यांनी रोहा पंचायत समितीच्या कार्यालयात सादर केला होता.
“त्यानुसारच महाराष्ट्र सिमलेस कंपनीच्या मिळकतीची फेर मोजणीची कार्यवाही ७ मार्चपासून सुरू करून होणाऱ्या मोजमापाप्रमाणेच कर आकारणी करून, वसुलीची कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाही बाबत या कार्यालयास अवगत करावे अशी स्पष्ट ताकीदही रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी कर आकारणी समितीला दिली आहे.”
दरम्यान महाराष्ट्र सिमलेस कंपनीच्या होणाऱ्या फेरमोजणी मधून कंपनीमध्ये नव्याने झालेल्या बांधकामाचा, कंपनीच्या हद्दीचा तसेच कंपनीकडून बेकायदेशीरपणे केला जाणाऱ्या जमिनीच्या वापराचा तपास या फेर मोजणीद्वारे होणार असल्याने कंपनीकडून दरवर्षी आकारला जाणाऱ्या घरपट्टी करामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे माजी सरपंच अर्चना सचिन भोसले यांनी त्यावेळी सरपंचपदी असताना केलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळाल्याने सरपंचपद जाऊनही त्यांचे कौतुक होत असून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.