महाराष्ट्र ग्रामीणराजकारण
राष्ट्रवादीचे नेते शिवरामभाऊ शिंदे यांचा माणगाव येथे सत्कार

राष्ट्रवादीचे नेते शिवरामभाऊ शिंदे यांचा माणगाव येथे सत्कार
राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या संपर्क अभियानात सन्मान
राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण (काका) आखाडे यांची उपस्थिती
महेश पवार
नागोठणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार ओबीसी विभागाच्या वतीने सुरू असलेल्या “अजितपर्व – पदाधिकारी संपर्क अभियान” अंतर्गत रायगड जिल्हा ओबीसी विभागाची व्यापक बैठक राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण (काका) आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत
माणगाव येथे गुरुवारी (दि.२०) संपन्न झाली. या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात अतिशय भक्कम व शिस्तबद्ध पद्धतीने काम करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात नागोठणे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी नेते व रोहा तालुका कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीला ओबीसी विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन औटे, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत रोडे, शामराव पेजे महामंडळाचे संचालक सुरेश मगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील, ओबीसी जेष्ठ नेते शिवराम शिंदे, नाना भौड, महादेव बक्कम, काका नवगणे, संतोष भोईर, प्रकाश लाड, राजू शिर्के यांच्यासह ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा बैठकीचे निमंत्रक बबन मनवे मंचावर उपस्थित होते. या बैठकीसाठी जिल्ह्यातील विविध भागातून पदाधिकारी व ओबीसी बांधवांची मोठी उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण (काका) आखाडे यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक बांधणी विषयी मार्गदर्शन करताना सर्व समाज घटकांना सोबत घेऊन न्याय देणारे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे नेतृत्व अधिक बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज जोडण्यासाठी ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.