चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय परप्रांतीय महिलेवर अत्याचार करणारा परप्रांतीय जेरबंद

चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय परप्रांतीय महिलेवर अत्याचार करणारा परप्रांतीय जेरबंद
पेण रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला केले अटक : आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी
महेश पवार
नागोठणे : घरात एकटीच असल्याचा फायदा घेऊन घरात प्रवेश करून तसेच चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय परप्रांतीय महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या उजागिरलाल रामलखन बन्सल (वय २१) रा. दरबारी, पो. व ता. चितरेगी, जि. सिंगरौलि (मध्य प्रदेश) सध्या रा. काळे कॉम्प्लेक्स, तळमजला, रुम नंबर १, पाटणसई, ता. रोहा या आरोपीला नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि. सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने २५ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता पेण रेल्वे स्थानक परिसरात शिताफीने अटक केले.
यासंदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार १९ वर्षीय फिर्यादी महिला ही पाटणसई गावात तिच्या पतीसह भाड्याच्या खोलीत राहण्यास आहे. सदर महिला एकटीच तिच्या घरातील कामे करीत असताना तिचे रूमचा दरवाजा कोणीतरी वाजवला म्हणून तिने दरवाजा उघडला असता दरवाजा बाहेर उभा असलेला आरोपी हा घरात आला. त्यानंतर त्याने घराचा दरवाजा बंद करून दरवाज्याची कडी लावून त्याच्यासोबत आणलेल्या चाकूचा धाक फिर्यादीस दाखवून तिला म्हणाला की, मुझे तुम्हारे साथ गलत शलत करने दो, नही तो मै तुम्हे चाकू से मार दूंगा… असा दम देऊन आरोपीने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली व तू जर आरडाओरडा केल्यास तुला चाकूने ठार मारेन अशी धमकी देऊन तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या पतीला ठार मारेन अशी धमकी देऊन आरोपी घटना स्थळावरून निघून पळून गेला होता.
सदर महिलेवर लैंगिक अत्याचाराची ही घटना दिनांक २२ मार्च रोजी रात्री ११.२४ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित महिलेने आपल्या पतीला विश्वासात घेऊन २५ मार्चला दिलेल्या तक्रारीनंतर नागोठणे पोलिसांनी तीन तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी आरोपी विरोधात नागोठणे पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला रोहा येथील फौजदारी न्यायालयाने २९ मार्च पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. नागोठणे पोलिसांच्या या कारवाई बद्दल नागोठणे पोलिसांचे कौतुक होत असून याप्रकरणी अधिक तपास नागोठण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी करीत आहेत.