नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौक व नुक्कड गल्ली परिसरात वारंवार वाहतुक कोंडी
नुक्कड गल्ली झालेय खाऊ गल्ली व पार्किंग गल्ली

नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौक व नुक्कड गल्ली परिसरात वारंवार वाहतुक कोंडी
नुक्कड गल्ली झालेय खाऊ गल्ली व पार्किंग गल्ली
वाहतुक पोलीसही हतबळ : ठोस उपाय योजनेची गरज
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौक परिसर, मासळीबाजारकडे जाणारा रस्ता व पोलीस ठाण्याकडे जाणा-या रस्त्यावरील नुक्कड गल्लीत वारंवार होणा-या व दिवसेंदिवस वाढणा-या वाहतुक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वाहन चालक व खरेदी साठी येणारे येथील नागरिकही त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासनाने याबाबतीत संयुक्तिकपणे ठोस कारवाई व उपाययोजना करण्याची नितांत गरज आता निर्माण झाली आहे. तसेच छ.शिवाजी महाराज चौक व नुक्कड गल्ली परिसरात सायंकाळी वाहतूक पोलिसांनी आपली करडी नजर ठेवावी अशीही मागणी होत आहे.
नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौक परिसरात दोन्ही बाजुला असलेली किराणा, मिठाई व इतर दुकाने, हॉटेल्स, मेडिकल स्टोअर, हातगाड्या तसेच प्रशस्त भाजीबाजार इमारतीत न बसता रस्त्याला खेटूनच बसलेले भाजीविक्रेते व इतर लहान मोठी दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्व दुकानांत मोटारसायकलवरुन येणारे ग्राहक रहदारीच्या रस्त्यावरच आपली वाहने उभी करतात. दुकानदारही आपला धंदा बुडू नये यासाठी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच छ. शिवाजी महाराज चौक परिसरात अनेक मालकांनी आपली दुकाने भाड्याने दिली असल्याने या भाडेकरू धंदेवाल्यांनी समोरील मोकळ्या जागेतही अतिक्रमणे करून वेगवेगळी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे आधीच अरूंद असलेल्या या रस्त्यावरून जाणारी दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास छ. शिवाजी महाराज चौक परिसरात व नुक्कड गल्ली मध्ये वारंवार वाहतुक कोंडी होत आहे. विशेष करुन सायंकाळच्या वेळेत हे वाहतुक कोंडीचे प्रमाण खुप मोठे आहे. या वाहतुक कोंडीचा मोठा फटका नागोठणे स्थानकात येणा-या एस.टी.बसचालकांना बसत आहे. रस्त्यावरच उभ्या करण्यात येणा-या चार चाकी, दुचाकी वाहनांमुळे शिवाजी चौक परिसरातुन एस.टी.बस स्थानकात नेतांना चालकांना तारेवरची कसरत आहे. त्यामुळे कित्येकदा एस.टी. चालक व दुचाकीस्वार यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.
नुक्कड गल्ली बनलेय खाऊ गल्ली व पार्किंग गल्ली
येथील अरुंद नुक्कड गल्लीत दोन्ही बाजूला पूर्वी एक–दोनच खाद्य पदार्थांची दुकाने होती. मात्र आता गेल्या काही महिन्यांत नुक्कड गल्लीत विविध प्रकारची खाद्य पदार्थांची दुकाने वाढली आहेत. या दुकानांत येणारे ग्राहक नुक्कड गल्लीतील रस्त्याच्या दुतर्फा आपली दुचाकी वाहने बिनधास्तपणे उभी करून खाद्य पदार्थांच्या दुकानात बसलेले असतात. त्यामुळे येथून एक चार चाकी वाहनही काढणे जिकरीचे होत आहे. पोलीस ठाण्यात जाण्याचा हाच मुख्य मार्ग असल्याने पोलिसांच्या वाहनालाही येथे काही वेळेस थांबून राहावे लागत असूनही सर्व काही अलबेल असल्याचे बोलले जात आहे. शनिवारी (दि.२९) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नुक्कड गल्लीत झालेल्या वाहतूक कोंडीत दुचाकी व कार चालकांना अडकून रहावे लागले.
वाहतूक पोलीसही होत आहेत हतबल
छ. शिवाजी चौक परिसरासाठी एक – दोन वाहतुक पोलीस कार्यरत असतात. मात्र काही वेळेस त्यांना दुसरी ड्युटी लागल्याने येथे एकही वाहतूक पोलीस नसतो. बेशीस्त वाहनचालकांच्या अडमुठेपणामुळे गर्दीच्या वेळी तर एक – दोन वाहतुक पोलीस तरी कुठे कुठे लक्ष ठेवणार ? हा मुख्य प्रश्न असल्याने ते सुध्दा हतबळ झाल्याचे दिसुन येत आहेत. त्यामुळे अशा बेशीस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सुरु केल्यास रस्त्यावर वाहने उभी करणा-यांना चाप बसेल असेही बोलले जात आहे. शिवाय येथील छ. शिवाजी चौक परिसरात काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या सम – विषम तारखांनुसार पी १, पी २ पार्कींग व्यवस्थेचा सध्या बोजवारा उडाल्याने ती पध्दत पुन्हा सुरु करावी अशीही मागणी नागरिकांतुन होत आहे.
नुक्कड गल्लीत वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई : स.पो.नि. सचिन कुलकर्णी
अलिबाग येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शांतता समितीच्या सभेत वाहतूक कोंडीचा विषय प्रामुख्याने समोर आला होता. नागोठणे शहरही त्यामधून सुटलेले नाही. वाहतूक कोंडीस जबाबदार ठरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले होते. त्यानुसारच नागोठण्यातील वाहतूक कोंडीची गंभीर समस्या बनत चाललेल्या छ. शिवाजी महाराज चौक परिसर व नुक्कड गल्लीत रविवारी(दि.३०) सकाळी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या, वाहन परवाना आणि हेल्मेट नसलेल्या १५ दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिस राजेंद्र गणार व मनोहर माळी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई केल्याचे नागोठण्याचे सापोनि सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.