धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण
पालखी व उरुस आनंदोत्सव म्हणून साजरा करा व नागोठण्याचे नाव टिकून ठेवा – स पो.नि.सचिन कुलकर्णी
शांतता समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा

पालखी व उरुस आनंदोत्सव म्हणून साजरे करा व नागोठण्याचे नाव टिकून ठेवा – स पो.नि.सचिन कुलकर्णी
शांतता समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा
नुक्कड गल्लीतील अवैध पार्किंगवर व दुकानदारांवर कारवाईचे संकेत
महेश पवार
नागोठणे : नागोठणे गावची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळा, मीरा मोहिद्दीन शाह बाबा यांचा उरुस आगामी काळात साजरा होणार आहे. त्यामुळे पालखी सोहळा उरूससाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व परवानग्या दोन्ही उत्सव समितीने घ्याव्यात. कोणत्याही प्रकारचे वादविवाद न करता शासनाच्या अटी शर्तीचे पालन करत नियमांनुसार सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडत पालखी सोहळा व उरुस भक्तिमय वातावरणात, सोहळ्यास गालबोट लागणार नाही याची काळजी घेत पालखी व उरुस आनंदोत्सव म्हणून साजरा करा आणि परिसरात शांतताप्रिय व आदर्श ठरलेल्या नागोठण्याचे नाव टिकून ठेवा असे बहुमोल मार्गदर्शन नागोठणे पोलिस ठाण्याचे स. पो.नि.सचिन कुलकर्णी यांनी उपस्थित नागरिकांना केले. तर नुक्कड गल्लीतील वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चा होऊन यापुढे येथील दुकानदारांनाही कारवाईस सामोरे जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

आगामी येणारे सण उत्सव साजरे करण्यासंदर्भात
नागोठणे पोलीस ठाण्यात शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. आयोजित शांतता समितीच्या बैठकीत कुलकर्णी बोलत होते. यावेळी श्री जोगेश्वरी माता देवस्थानचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, सचिव भाई टके, नागोठण्याच्या सरपंच सुप्रिया महाडिक, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, बाळासाहेब टके, उपसरपंच अखलाक पानसरे, उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर, उपाध्यक्ष संतोष चितळकर, उरूस कमिटीचे अध्यक्ष गुलजार सिंधी, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सांळुखे, अमृता महाडिक, प्रकाश कांबळे, उत्सव समितीचे अनिल पवार, जितू कजबजे, राजा गुरव, दिगंबर खराडे, घनश्याम ताडकर, सुदर्शन कोटकर, मोहन नागोठणेकर, पांडुरंग कोळी, राजेश पिंपळे, अल्विन नाकते, अनंत चितळकर, अनिल महाडिक, संतोष पाटील, पो.ह. विनोद पाटील, स्वप्नील भालेराव, अशपाक पानसरे, सिराज पानसरे, मंजर जुईकर, जोयेब कुरेशी, आसिफ मुल्ला, हुसेन पठाण, सज्जाद पानसरे, बाबा मुल्ला, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सचिन कुलकर्णी पालखी सोहळ्याविषयी सूचना करताना पुढे म्हणाले की,
गेल्या वर्षीच्या रामनवमी पालखीत झालेल्या वादाचे पडसाद अजूनही काहीजण भोगत आहेत. त्यामुळे कुणीही वैयक्तिक दुश्मनी सार्वजनिक सोहळ्यात आणू नये. ४–५ घरे मिळून एकाच ठिकाणी पूजा करा, पालखीच्या दोन्ही बाजूने दर्शन घ्यावे, पालखी माझ्या घरासमोर नाही म्हणून वाद घालू नका, पालखी सोबत फोटो व सेल्फी काढण्यात खूप वेळ वाया जातो त्यावर नियंत्रण ठेवा, आपल्या संस्कृती, परंपरा आपणच जपायचा आहेत, पालखीचा पारंपरिक मार्ग न बदलता पालखी मागील सोहळ्याच्या ७८ तासांपेक्षा कमी अशा ५२ तासांत गेल्यावर्षी मंदिरात पोचली होती. यावर्षी त्यापेक्षा कमीत कमी वेळेत मंदिरात कशी पोहचेल यासाठी प्रयत्न करा. कमी वयाच्या मुलांना स्वयंसेवकांचे ओळखपत्र न देणे यांसह उत्सव कमिटीलाही कुलकर्णी यांनी महत्वाच्या सूचना केल्या.
डी.जे. आढळल्यास होणार कारवाई :मातेच्या पालखीत बेंजो, खालुबाजा, नाशिक ढोल अशी पारंपरिक वाद्ये पालखीत वाजवा. डी.जे. वर न्यायालयीन बंदी असल्याने जर कुणी डी. जे. वाजवताना आढळल्यास कारवाई अटळ आहे. पोलिस हे समाजाला दिशा दाखविण्याचे कामच करीत असल्याने त्यांना सहकार्य करा तसेच उत्सव समितीलाही सहकार्य करा.
दारू पिऊन पालखीत वाद करणाऱ्यांवर होणार कारवाई :वर्षातून एकदा मातेची पालखी आपल्या घरासमोर येणार असल्याने प्रत्येकजण आपापल्या परीने आनंदोत्सव साजरा करीत असतो. मात्र पालखी आपली असून पालखीत कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वांनी घ्या. त्यामुळे पालखीत दारू पिऊन वाद निर्माण करण्याचा तसेच कायदा व सुव्यवस्था याला बाधा निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
उरूस कमिटीलाही केल्या महत्वपूर्ण सूचना :नागोठण्यातील उरूस दोन दिवसांचा असतो. त्यामुळे पहिल्या दिवशी संदल निघते तेव्हा उरूस कमिटीच्या सर्वच सदस्यांनी संदल सोबत न येता काहींनी उरूसमध्ये थांबावे, यावर्षी दुकानांची संख्या वाढणार असल्याने त्यासाठी लागणारी लाईट कायदेशीर मार्गाने घ्या, चोरटी लाईट घेऊ नका, खाद्य पदार्थांचा दर्जा चांगला आहे का याची खात्री करून खरेदी करा, उत्सवात अंमली पदार्थ आढळल्यास कारवाई करणार, उरूसमध्ये आपत्कालीन प्रसंगात जनरेटर, माईक व्यवस्थेसह नागरिक मदत केंद्र, रुग्णवाहिका, वाहने पार्किंग व्यवस्था व इतर सर्वच बाबतीत चोख व्यवस्था करा. लहान मुले हरविणार नाहीत याची काळजीही पालकांनी घ्यावी.
पालखी उत्सव व उरुस कमिटीतील पाच पाच जणांचा होणार गौरव :जोगेश्वरी माता पालखी सोहळा व उरुस या दोन्ही सोहळ्यांमध्ये चांगले काम करणाऱ्या दोन्ही कमिटी मधील प्रत्येकी पाच पाच सदस्यांचा सत्कार नागोठणे पोलिस ठाण्याच्या वतीने रोख रक्कम, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा स.पो.नि. सचिन कुलकर्णी यांनी बैठकीत केली. प्रथमच अशी उत्साह वाढविणारी योजना आल्याने दोन्ही कमिटी मधील सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान पालखी सोहळ्याच्या वेळी गावातील सर्व पथदिवे सुरू करून घेण्याची सूचनाही यावेळी कुलकर्णी यांनी केली. मात्र वीज वितरणचे अधिकारी वा त्यांचा कुणीही प्रतिनिधी या बैठकीस न आल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.