धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण
नागोठणे गवळआळीतील श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळा उत्साहात संपन्न

नागोठणे गवळआळीतील श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळा उत्साहात संपन्न
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील गवळ आळी येथील शिवसह्याद्री मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ गवळआळी यांच्यावतीने श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळा रविवार दि. ६ एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गवळ आळीतील या श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळ्याचे हे सलगपणे १५ वे वर्ष होते. या पालखी सोहळ्यासाठी गवळ आळीसह के. एम. जी. विभाग व नागोठण्यातील ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गवळआळीतील श्री गणेश, राधाकृष्ण, श्री साईबाबा मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या श्री साईबाबा उत्सव सोहळ्याची सुरुवात सकाळी ठीक सात वाजता श्री साईबाबांना दुग्धअभिषेक घालून करण्यात आली. त्यानंतर सकाळी ८ वाजता ध्वजपूजन करण्यात आलें. नंतर अनेक धार्मिक पूजा विधी व होमहवन करण्यात आले. दुपारी ठीक १२.०० वा. श्री साईबाबांची महाआरती घेण्यात आली. आरतीनंतर साईबाबांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी साई भक्तांच्या गर्दीने मंदिर फुलून गेला होता. या महाआरतीने संपूर्ण गवळआळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नंतर सायंकाळी ६ वाजता श्री साईबाबांच्या पालखीची वाजत गाजत सुरुवात करण्यात आली. ही पालखी संपूर्ण गवळआळीत फिरविण्यात आली. यावेळी सर्व अबाल-वृध्दांनी पालखीत नाचण्याचा आनंद लुटला. अखेर रात्री ११ वाजता मंदिरात पालखीची सांगता झाली. श्रीसाईबाबा उत्सव व पालखी सोहळ्यासाठी गवळआळी मधील श्री गणपती, राधाकृष्ण, साईबाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या मान्यवरांचा मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष विलास चौलकर यांच्या हस्ते साईबाबांची मानाची शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यानिमित्त गवळआळीतील साईभक्त श्री व सौ. साक्षी किरण वादळ यांनी उपस्थित भाविकांसाठी आयोजित केलेल्या साई भंडाऱ्याचा सर्व साई भक्त व ग्रामस्थांनी लाभ घेतला. श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी श्री गणेश, राधा कृष्ण, श्री साईबाबा मंदिराचे विश्वस्त समितीचे व ग्रामस्थ मंडळ गवळआळीचे अध्यक्ष विलास चौलकर, सचिव सुदाम घाग, शिवसह्याद्री मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप राऊत, उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश जगताप, उपाध्यक्ष सूरज तळेकर, सचिव राज चौलकर, गणेश घाग, दिनेश घाग, रवी वाजे, दिनेश वादळ , जगदीश चौलकर, विकास वादळ आदींसह उत्सव समितीचे सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ व महिला भगिनींनी मेहनत घेतली.