नागोठण्यातील जोगेश्वरी नगरमध्ये श्री रामनवमी सोहळा उत्साहात संपन्न

नागोठण्यातील जोगेश्वरी नगरमध्ये श्री रामनवमी सोहळा उत्साहात संपन्न
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील विविध भागांत श्री राम नवमी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. नागोठण्यातील पुरातन राम कुंड येथील श्रीराम मंदिर, नवीन रामेश्वर मंदिर, गवळआळी येथील श्री राधाकृष्ण मंदिर तसेच जोगेश्वरी नगर येथील श्री राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जोगेश्वरी नगर (गावठाण) मधील श्री राम नवमी उत्सव सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक ३० मार्च पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३० मार्च रोजी सायंकाळी संत सेवा मंडळ, नागोठणे यांचा हरिपाठ घेण्यात आला. मंगळवार १ मार्च रोजी रात्री ९ वाजता ह. भ. प. कृष्णा तांबे महाराज यांचे कीर्तन झाले. बुधवारी (दि.२) कर्जत येथील सागर सुर्वे यांचे पानिपत लढाईवर व्याख्यान संपन्न झाले. गुरुवारी(दि.३) रात्री साई सेवा मंडळ, कासू विभाग यांचे भजन झाले. तर शुक्रवारी(दि.४) डोलवहाळ येथील बामणे मंडळाचे हरिपाठ व भजन संपन्न झाले.

श्री राम नवमी उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व, माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी तसेच रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर, नागोठण्याचे सपोनि. सचिन कुलकर्णी यांनी जोगेश्वरी नगरमधील श्री राम मंदिरात येऊन दर्शन घेतले. यावेळी उत्सव समितीचे उपाध्यक्ष केदार चितळे, मंदार चितळे, सचिन येरूनकर, सौ. मुग्धा मंदार चितळे, सौ. उषा खैरे, सौ. कस्तुरी केदार चितळे, सौ. नेहा शिर्के आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी आयोजक स्वराज्य मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ, जोगेश्वरी नगर यांनी अपार मेहनत घेतली.