कायदेविषयकमहाराष्ट्र ग्रामीण
न्यायाधीशांचे वागणे हे प्रभू श्री रामांसारखे असावे
ॲड. विनोद घायाळ यांनी कुळ कायद्यावर केले बहुमोल मार्गदर्शन

न्यायाधीशांचे वागणे हे प्रभू श्री रामांसारखे असावे – रोहा दिवाणी न्यायाधीश एस. एस. महाले
ॲड. विनोद घायाळ यांनी कुळ कायद्यावर केले बहुमोल मार्गदर्शन
नवनिर्वाचित न्यायाधीश श्रेयस धारप यांचा सत्कार
महेश पवार
नागोठणे : आपल्या सोबतच्या वकील वर्गातून जेव्हा कुणी न्यायाधीश होतो तेव्हा इतरांना प्रेरणा मिळते. त्यामुळे ज्युनिअर वकिलांनी न्यायाधीश होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांच्या नजरेतून न्यायाधीश हे डॉक्टरांबरोबर मानले जातात. आजही काहीजण कोर्ट रूम मध्ये येतांना चप्पल बाहेर काढतात. न्यायाधीश पदावर काम करतांना खूप त्याग करावा लागतो, स्वतःवर खूप बंधने ठेवावी लागतात, स्वतःसाठी एक लक्ष्मण रेषा आखावी लागते, स्वतःवर अलिखित बंधने आणावी लागतात. आपल्या चांगल्यासाठीच या गोष्टी असल्याचे सांगून न्यायाधीशांचे वागणे हे प्रभू श्री रामांसारखे असावे असे मत रोहा न्यायालयातील प्रमुख दिवाणी न्यायाधीश एस. एस. महाले यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी न्यायाधीश परीक्षेची तयारी, तसेच ज्युनिअर वकिलांनी यासाठी कसे प्रयत्न करावेत याविषयी मार्गदर्शन करतांनाच रोहा न्यायालयात यापूर्वी राबविलेल्या कार्यक्रमांचे कौतुक करून यापुढेही असे उपक्रम राबविण्यास सांगितले.

रोहा वकील संघटनेच्या सहकार्याने व अधिवक्ता परिषद रोहा शाखा यांच्या वतीने रोहा न्यायालयातील वकील बार रुम मध्ये बुधवारी(दि.९) सायंकाळी न्यायालयीन कामकाजाच्या वेळेनंतर संपन्न झालेल्या माणगाव येथील ज्येष्ठ विधिज्ञ विनोद घायाळ यांचे कुळ कायद्यातील तरतुदी यावर व्याख्यान व नवनिर्वाचित न्यायाधीश श्रेयस धनंजय धारप यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला रोहा दिवाणी व फौजदारी न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश सुनील महाले, सह न्यायाधीश मेघा हासगे, रोहा वकील संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ आर.बी. सावंत,
अधिवक्ता परिषद कोकण प्रांत सचिव ॲड. श्रीराम ठोसर, अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेचे अध्यक्ष धनंजय धारप, उपाध्यक्षा मिरा पाटील, उपाध्यक्ष समीर सानप, सचिव मीनल मनोहर, सचिव महेश घायले, कोषाध्यक्ष दिनेश वर्मा, कार्यालयीन सहसचिव दिव्या सावंत, अधिवक्ता परिषदेचे जिल्हा कार्यकारणीचे सदस्य प्रशांत वर्तक, स्वराज मोरे, अधिवक्ता परिषद अलिबाग, संघटन सचिव निकेत चवरकर, अधिवक्ता परिषद, अलिबाग तालुका सचिव ॲड. सचिन मकाणी, अधिवक्ता परिषद सेक्रेटरी ॲड. अभिजीत बागवे, ॲड. एम.के.शिंदे, अॅड.एस.ए.हाफिज, ॲड. श्रीकांत रावकर, ॲड. हेमंत वाघ, ॲड. दीपक सोळंकी, ॲड. शंकर हारपाल, ॲड. फाल्गुनी ठक्कर, ॲड. जानकी कुलकर्णी आदींसह अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेचे सदस्य व वकील यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

माणगाव येथील ज्येष्ठ विधिज्ञ विनोद घायाळ यांनी कुळ कायद्यातील तरतुदी याविषयी मार्गदर्शन करतांना संरक्षित कुळ, कायम कुळ, ७/१२ कसा वाचावा, ७० ब, ३२ ग, ३२ म, कलम ७४ खालील अपील, कलम ८५ खालील तरतुदी याविषयी सर्व वकील वर्गाला उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
याच कार्यक्रमात सह दिवाणी न्यायाधीश मेघा हासगे यांनी आपल्या मनोगतात आपल्या येथील एक ज्युनिअर वकील न्यायाधीश झाले ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगून याची प्रेरणा इतर ज्युनिअर वकिलांनी घ्यावी असे सांगितले. तसेच ट्रेनिंग काळात नवनिर्वाचित न्यायाधीश श्रेयस धारप यांनी काय करावे याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमात नवनिर्वाचित न्यायाधीश श्रेयस धारप यांनी सत्काराला उत्तर दिले. तर ज्येष्ठ विधिज्ञ आर. बी. सावंत, श्रीराम ठोसर, धनंजय धारप यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना ॲड. मीनल मनोहर यांनी अधिवक्ता परिषद काय आहे व परिषदेचे कार्य कसे चालते याची संक्षिप्त माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. दिव्या सावंत यांनी तर आभार प्रदर्शन ॲड. महेश घायले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अधिवक्ता परिषदेच्या रोहा शाखेच्या व रोहा वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.