शिवसेना खासदार नरेश म्हस्के व मनसे नेते गोवर्धनभाई पोलसानी यांची नागोठण्यात भेट
अनेक जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

शिवसेना खासदार नरेश म्हस्के व मनसे नेते गोवर्धनभाई पोलसानी यांची नागोठण्यात भेट
अनेक जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
महेश पवार
नागोठणे : भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये असताना भारतीय विद्यार्थी सेनेचे तत्कालीन अध्यक्ष असलेले व मनसेचे विद्यमान अध्यक्ष राज ठाकरे यांचे त्यावेळचे युवा फळीतील दोन प्रमुख युवा कार्यकर्ते व शिवसेनेचे व विद्यमान खासदार नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी (दि.१८) महाडला जाताना मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलसानी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा कौंटुबिक भेट घेतली. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांचे गोवर्धनभाई पोलसानी व पवित्र पोलिसानी यांनी यथोचित व जोरदार स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेत असतानाच्या आपल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर खासदार नरेश म्हस्के महाड येथील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटवर्तीय व शिवसेनेचा आक्रमक चेहरा अशी स्वतःची ओळख निर्माण केलेले शिवसेनेचे प्रवक्ते व लोकसभेचे ठाणे मतदार संघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात राज ठाकरे प्रमुख असलेल्या शिवसेना अंतर्गत भारतीय विद्यार्थी सेनेतून केली होती. त्यावेळी गोवर्धनभाई पोलसानी व नरेश म्हस्के यांनी राज ठाकरेंसोबत एकत्रितपणे पक्ष वाढीसाठी काम पाहिले होते.
सर्वसामान्य कार्यकर्ता, नगरसेवक, जिल्हाप्रमुख, सभागृह नेता, सन २०१९ ते २०२२ मध्ये ठाणे महानगरपालिकेचे महापौर व आता खासदार असा त्यांच्या राजकीय प्रगतीचा चढता आलेख सर्वांनी जवळून पाहिला आहे. राज ठाकरे हे शिवसेनेपासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा वेगळा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला. त्यावेळी गोवर्धनभाई राज ठाकरेंसोबत गेले तर नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेच राहिले. असे असूनही दोघांच्या मैत्रीत तसूभरही फरक पडला नाही हेच आजच्या या भेटीवरून दिसून आले.
खा. नरेश म्हस्के यांच्या राजकीय यशाच्या चढत्या आलेखामध्ये गोवर्धनभाई पोलसानी त्यांच्या या प्रवासाचे त्यांचे जिवलग मित्र म्हणून साक्षीदार आहेत. असा आपला हा खासदार मित्र महाड येथे जात असल्याची माहिती मिळताच गोवर्धनभाई पोलसानी यांनी त्यांच्याशी संपर्क करून आपल्या निवासस्थानी येण्याची विनंती केली. आपल्या जिवलग राजकीय मित्राचा आग्रह खासदार नरेश म्हस्के यांना टाळता आला नाही. खासदार नरेश म्हस्के यांनी गोवर्धनभाई पोलसानी यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी मनसे व शिवसेना कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.