महाराष्ट्र ग्रामीणवाहतूक
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियान’ अंतर्गत नागोठणे बस स्थानकाचे मुल्यांकन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियान’ अंतर्गत नागोठणे बस स्थानकाचे मुल्यांकन
अनिल पवार
नागोठणे : राज्यशासनाने १ मे २०२३ या दिवशी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांचा कायापालट करण्याच्या उद्देशाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियान’ राबवण्याची घोषणा केल्यानंतर गेली दोन वर्षांपासून राज्यात सर्वत्र हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. याच राज्यशासनाच्या स्तुत्य उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिवहन मंडळांच्या रोहा आगारा अंतर्गत येणाऱ्या रोहा व नागोठणे बस स्थानकांची राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातून आलेल्या बस स्थानक मुल्यांकन समितीकडून बुधवार दि. १४ मे रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास पाहणी करून आढावा घेत मुल्यांकन करण्यात आले.

या मूल्यांकन समितीत एस.टी.चे ठाणे विभाग मंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी रमेश बांदल,
विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी कृष्णा बन,रोहा आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार,रोहा आगार स्थानक वाहतूक प्रमुख अजिंक्य रोहेकर, नागोठण्यातील पत्रकार अनिल पवार, नागोठणे स्थानकाचे वाहतूक नियंत्रक बाळकृष्ण वाडकर, प्रसाद पाटील, प्रवासी मित्र विपुल हेंडे आदी उपस्थित होते. दरम्यान यावेळी या मुल्यांकन समितीकडून बस स्थानकांची स्वच्छता, बसस्थानक व्यवस्थापन, स्त्री/पुरुष प्रसाधनगृहाची स्वच्छता, हरित बस स्थानक, बसेसची स्वच्छता, विद्यार्थी पास, बसस्थानक इमारतीची रंगरंगोटी, वाहक व चालक यांच्यासाठी असलेले विश्रांतीगृह, बस स्थानकातील मार्गदर्शक सूचना फलक याची पाहणी केली याचबरोबर बस स्थानकातील उपलब्ध सोयीसुविधा तसेच स्थानकात करायच्या असलेल्या सुधारणा यासंदर्भात रोहा आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी आवश्यक त्या योग्य सूचनाही यावेळी समितीकडून आगार व्यवस्थापक, बस स्थानक वाहतूक नियंत्रक तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या.
प्रवाशांचे हित लक्षात घेऊन बसस्थानकांच्या स्वच्छतेचे परीक्षण तटस्थपणे करुन त्याचा अहवाल मध्यवर्ती कार्यालय, मुंबई यांना सादर केला जाणार आहे. मूल्यांकन समितीने दाखविलेल्या त्रुटी दूर करुन बसस्थानके कायम स्वच्छ रहाण्याच्या दृष्टीने आगार प्रमुखांनी प्रयत्न करायचे आहे.असे यावेळी उपस्थित एस.टी. महामंडळाचे ठाणे विभागचे विभागीय वाहतूक अधिकारी रमेश बांदल यांनी सांगितले.