महाराष्ट्र ग्रामीणवाहतूक
मुंबई गोवा महामार्गाच नागोठण्यातील सर्व्हिस रोड खचला : वाहन चालकांना अपघाताचा धोका
कल्याण टोल प्लाझाकडून खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी

मुंबई गोवा महामार्गाच नागोठण्यातील सर्व्हिस रोड खचला : वाहन चालकांना अपघाताचा धोका
कल्याण टोल प्लाझाकडून खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी
महेश पवार
नागोठणे : मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला नागोठणे परिसरात काहीसा वेग आला असला तरी महामार्ग लवकर पूर्ण करण्याच्या नादात निकृष्ठ दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप वाहन चालकांतून होत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे नागोठण्यातील एच डी एफ सी बँकेसमोर असलेला महामार्गाचा सर्व्हिस रोड गुरुवारी (दि.१५) सायंकाळी मोठ्या प्रमाणात खचला. सुदैवाने त्यावेळी सर्व्हिस रोडवर वाहने नसल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

मुंबई गोवा महामार्गावर नागोठण्यातील रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गासमोर बंदिस्त उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला भराव करण्यात येत आहे. यासाठी या पुलाच्या दोन्ही बाजूला तयार करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडवरून महाड व मुंबई बाजूकडे जाणारी वाहतूक सुरू आहे. अशाचप्रकारे मुंबई बाजूकडे जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडचा वापर मुंबई बाजूकडे जाणारी लहान मोठी व अवजड वाहने करीत आहेत. याच सर्व्हिस रोडवर एच डी एफ सी बँकेसमोर असलेला रस्ता गुरुवारी सायंकाळी अचानक खचला. या सर्व्हिस रोडच्या बाजूला पुलासाठी करण्यात येणाऱ्या भरवलगत पाण्याचा मोठा खड्डा असल्यानेच सर्व्हिस रोडला ओलावा निर्माण होऊन हा सर्व्हिस रोड खचल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
सर्व्हिस रोड खचल्याची माहिती नागोठण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना काही जागरूक नागरिकांनी देताच त्यांनी महामार्ग चौपदरीकरण कामाचे ठेकेदार कल्याण टोल प्लाझा कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. नंतर थोड्याच वेळात सर्व्हिस रोड खचलेल्या ठिकाणी खडी टाकण्यात आली. मात्र असे असले तरी या खडीवरून मोटारसायकल व इतर लहान वाहने घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या सर्व्हिस रोडची डागडुजी म्हणजे “रोगापेक्षा इलाज भयंकर” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व्हिस रोड खचलेल्या ठिकाणी संभाव्य अपघात घडण्यापूर्वी रस्त्यावर त्वरीत डांबरीकरण करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. तर या ठिकाणी डांबरीकरण करण्यासाठी कल्याण टोल प्लाझाचे अधिकारी एखाद्या अपघाताची वाट पाहत आहेत का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
यासंदर्भात कल्याण टोल प्लाझाचे अधिकारी विजय चन्ने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डांबर प्लांट ची अडचण सांगितली. मात्र असे असले तरी सर्व्हिस रोड खचलेल्या ठिकाणी लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.