महाराष्ट्र ग्रामीण
जातीय सलोखा अबाधित ठेवून सण उत्साहात साजरे करा – सपोनि. सचिन कुलकर्णी
शांतता समितीच्या बैठकीत बहुमोल मार्गदर्शन

जातीय सलोखा अबाधित ठेवून सण उत्साहात साजरे करा – सपोनि. सचिन कुलकर्णी
शांतता समितीच्या बैठकीत बहुमोल मार्गदर्शन
अनिल पवार
नागोठणे : नागोठणे शहर व विभागात सर्व धर्मीय समाज बांधव, सर्व नागरिक एकोप्याने राहतात. तसेच शांतताप्रिय नागोठणे अशी असलेली नागोठण्याची ओळख अशीच भविष्यात यापुढेही कायम राखण्यासाठी गैरसमजातून वाद निर्माण होत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेत सर्वानी जातीय सलोखा अबाधित ठेवून आगामी काळात सण उत्साहात साजरे करण्याचे आवाहन नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी नागोठणे पोलिस ठाण्यातील शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित शहर व परिसरातील नागरिकांना केले.
मे महिन्यात शनिवार दि. ७ रोजी मुस्लिम समुदायासाठी एक मोठा आणि महत्त्वाचा असणारा बकरी ईद सण मुस्लिम समाज बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस उपअधीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाण्यात शांतता समिती सदस्य,प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार, मोहल्ला समिती सदस्य,हद्दीतील विविध गावांचे पोलिस पाटील यांची संयुक्त बैठक रविवार दि.२५ रोजी सायं. ५ वा. नागोठणे पोलिस ठाण्यात संपन्न झाली. यावेळी सपोनि. सचिन कुलकर्णी यांच्यासह पो.ह. स्वप्नील भालेराव, अशपाक पानसरे, असिफ मुल्ला, अबुबकर पानसरे,बाबा मुल्ला, सलीम अत्तार, आफताब मुजावर,अजिम बेणसेकर, सलाऊद्दीन मोमीन, मुजफ्फर कडवेकर तसेच वैशाली गायकवाड, अदिती ठाकूर, चैत्राली झोलगे, विठ्ठल शिंदे, पंकज कोकाटे, दिलीप हंबीर, यशवंत खंडवी, श्रीधर गदमले, सुभाष कदम आदी हद्दीतील पोलिस पाटील उपस्थित होते.
दरम्यान सर्व सण उत्सव एकत्र येऊन गुण्यागोविंदाने साजरे करतात अशा येथील या आधीचा इतिहास आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी येणाऱ्या सण उत्सव काळात कोणीही कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये. तसेच कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवू नयेत.जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार न घडता आपला सण उत्साहात साजरा करता येईल; असा मार्मिक सल्ला या बैठकीत सपोनि. सचिन कुलकर्णी यांनी उपस्थितांना दिला.तर याचवेळी नागोठणे परिसरातील असणाऱ्या विविध कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता शहर व परिसरात येणाऱ्या भाडोत्री तत्वावर राहणाऱ्या नागरिकांची योग्य माहिती घेत त्यांची ओळख पडताळणी करणे आवश्यक असल्याचे सांगत सद्यस्थितीत वादळीवाऱ्यासह धुंवाधार अवकाळी पाऊस सुरु असल्याने शहर व परिसरात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याची तातडीने माहिती देण्याच्या सूचनाही यावेळी कुलकर्णी यांनी उपस्थितांना दिल्या.