अपघातमहाराष्ट्र ग्रामीण
मुंबई – गोवा महामार्गावर कार व बस अपघातात दोघेजण गंभीर जखमी

मुंबई – गोवा महामार्गावर कार व बस अपघातात दोघेजण गंभीर जखमी
दिनेश ठमके
सुकेळी : मुंबई -गोवा महामार्गावरील खांब गावाच्या हद्दीमध्ये फॉर्च्यूनर कार व एस टी बस यांच्यामध्ये अपघात होऊन कारमधील दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.१) सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.
यासंदर्भात कोलाड पोलिस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहिती नुसार कार चालक संतोष सुदाम मेढेकर (वय- ५५) हे आपली फॉर्च्यूनर कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन चालवत होते. त्याचवेळी एस. टी. चालक संतोष बुधकर (वय- ४०) हे मुंबई बाजुकडुन महाडकडे एस टी बस घेऊन जात असताना फॉर्च्यूनर कारची एस. टी. गाडीला जोरदार धडक बसुन हा भीषण अपघात घडला. या अपघातात कार चालक संतोष मेढेकर हे कार मध्येच दबले गेले होते . त्यांना अथक प्रयत्नानंतर रेस्क्यु टीमच्या मार्फत बाहेर काढण्यात आले. तर त्यांच्या पत्नी कविता मेढेकर यांना देखील गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असुन दोघांनाही तात्काळ सुकेळी येथिल जिंदल रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी पुढे पाठविण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताचा पुढील तपास कोलाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नितीन मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नागे करीत आहेत.