धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीणसांस्कृतिक
नागोठण्याचा भूषण कु. मेघ पोटेच्या बासरी वादनाने ठाणेकर भारावले
खा. नरेश म्हस्के यांच्याकडून कौतुक

नागोठण्याचा भूषण कु. मेघ पोटेच्या बासरी वादनाने ठाणेकर भारावले
खा. नरेश म्हस्के यांच्याकडून कौतुक
स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक नाट्यगृहात झाला कार्यक्रम
महेश पवार
नागोठणे : आषाढी एकादशी निमित्त ठाणे येथील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक नाट्यगृहातील “वारी पंढरीची” या बासरी वादन कार्यक्रमात नागोठण्याचा सुपुत्र व बाल बासरी वादक कुमार मेघ निलेश पोटे याने एकाहून एक सरस अशी भक्ती गीते व अभंग सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. या बासरी वादन कार्यक्रमासाठी नाट्यगृह उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करणारे मनसेचे रायगड जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलसानी यांनी आपले मित्र व शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनाही कुमार मेघ पोटे याच्या या बासरी वादन कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहा अशी विनंती केल्याने खा. नरेश म्हस्के हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसेच त्यांनी बाल बासरी वादक कुमार मेघ पोटे याचे कौतुक करून त्याचा यथोचित सत्कार केला.

रिवाज म्युझिक तर्फे बाळासाहेब ठाकरे स्मारक ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या “वारी पंढरीची” या अभंग संध्या मध्ये खासदार नरेश म्हस्के उपस्थित राहिले होते. कुमार मेघ नीलेश पोटे याच्या बासरी वादनाचे कौतुक करताना खा. नरेश म्हस्के म्हणाले की, अत्यंत लहान मुलाकडून बासरी वाजवून बासरीच्या सुरात अभंगांचे गायन करण्यात आले. एक वेगळा प्रकार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. रिवाज म्युझिक यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे स्मारक, ठाणे येथे “वारी पंढरीची” या विशेष अभंग संध्येचं आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि त्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मला मिळाली. या कार्यक्रमात बाल कलाकार कुमार मेघ निलेश पोटे या लहान मुलाने आपल्या बासरीच्या सुरात अभंग गाऊन उपस्थितांची मनं जिंकली. बासरी सारख्या वाद्यावरून इतकी सुंदर अभंगांची साद, ती देखील एका लहान मुलाकडून हे खरंच अद्वितीय आणि प्रेरणादायी होते. मेघ पोटे याच्या सादरीकरणाने सर्व उपस्थित मान्यवर भारावून गेले होते. त्याच्या या कलेसाठी त्याचा सत्कार करून मला त्याचे मनापासून कौतुक करण्यास मिळाले. त्याचबरोबर रिवाज म्युझिकचं यासाठी विशेष कौतुक की, त्यांनी अशा लहान वयाच्या कलाकारांना संधी दिली आणि परंपरेला नव्या पिढीशी जोडण्याचं काम त्यांनी केले. अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली.