सुकेळी खिंडीतील मोटारसायकल अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
धोकादायक सुकेळी खिंड अजून किती बळी घेणार ?

सुकेळी खिंडीतील मोटारसायकल अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू : तरुणी गंभीर जखमी
धोकादायक सुकेळी खिंड अजून किती बळी घेणार ?
महेश पवार
नागोठणे : अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या सुकेळी खिंडीत नागोठणे बाजूकडील वळणावर मोटरसायकलला झालेल्या अपघातात क्रिश देवा साउथी (नेपाळी) वय २० वर्ष, सध्या रा. मुंबई, या नेपाळी तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातग्रस्त मोटार सायकलवर या तरुणाच्या मागे बसलेली जास्मिन इकबाल इंद्रेशी वय १८ वर्षे,
रा. घणसोली, सेक्टर २ – ठाणे, ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या तरुणीवर सुकेळी येथील जिंदाल हॉस्पिटलमध्ये अधिक उपचार सुरू आहेत. हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी गावचे हद्दीत हॉटेल विजय समोर धोकादायक वळणावर सोमवार दिनांक ७ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
या संदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार अपघातातील मृत तरुण क्रिश देवा साऊथी (नेपाळी) हा त्याचे ताब्यातील टीव्हीएस कंपनीची NTORQ मोटर सायकलवरून (क्र.एम.एच. ४३ सिजे ७७०२) पाठीमागे बसलेली जास्मिन इकबाल इंद्रेशी हिला सोबत घेऊन मुंबई गोवा महामार्गावरून महाबळेश्वर ते मुंबई असा मोटारसायकल स्वतः चालवित घेऊन जात असताना सुकेळी गावच्या हद्दीतील सुकेळी खिंडीतील विजय हॉटेलचे समोर उतारावर वळणावर हा तरुण आला असता त्याचे मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल दोन्ही रस्त्याचे मधील डिव्हायडरला ठोकर देऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन अपघात झाला.
या अपघातात मोटरसायकल चालक क्रिश देवा साऊथी यांचे डोक्याला गंभीर दुखापती झाल्याने तसेच पाठीमागे बसलेली जखमी जास्मिन हिच्या डोक्यालाही गंभीर दुखापत व उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन दुखापती झाल्याने महामार्ग पोलिसांच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक गीतांजली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ऐनघर मदत केंद्रातील पोलिस कर्मचाऱ्यांनी या दोघांना उपचाराकरिता सुकेळी येथील बी सी जिंदाल हॉस्पिटल मध्ये नेले.
जखमींना डॉक्टरांनी तपासले असता त्यांनी मोटरसायकल चालक क्रिश देवा साउथी (नेपाळी) यास मृत घोषित केले. तर जखमी जास्मिनवर जिंदाल हॉस्पिटल येथे अधिक उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त वाहन रस्त्याचे बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास नागठणे पोलीस करीत आहेत.