अपघातमहाराष्ट्र ग्रामीण
कोलेटी येथील एस. टी – टेम्पो अपघातात टेम्पोचालक गंभीर जखमी
एस. टी. बस मधील १० प्रवासी जखमी

कोलेटी येथील एस. टी – टेम्पो अपघातात टेम्पोचालक गंभीर जखमी
एस. टी. बस मधील १० प्रवासी जखमी
महेश पवार
नागोठणे : रखडलेल्या महामार्गाची सध्या पावसामुळे दुर्दशा झालेली असतांनाच अपघातांचे सत्रही सुरूच आहे. यातच नागोठण्याजवळील कोलेटी येथे एस. टी. बस व मालवाहू आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात टेम्पोच्या केबिनला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन केबिन मध्ये अडकून पडलेला टेम्पो चालक दिनेश यादव हा गंभीर जखमी होऊन त्याच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. टेम्पोत अडकलेल्या चालकाला स्थानिक नागरिकांनी लोखंडी साखळीच्या सहाय्याने टेम्पोचा आतील भाग मागे ओढून मोकळे केले. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी(दि.१) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
यासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शिवथरघळ – ठाणे असा प्रवास करणाऱ्या
एसटी बसचा चालक दिनकर गोविंद डोंगरे (वय ३६ वर्षे) रा. गोठाता, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर हा एस टी च्या ठाणे आगाराची बस शिवथरघळ ते ठाणे अशी ५० प्रवासी घेऊन ठाणे येथे जात होता. बस अपघात ठिकाणी आलेवेळी त्याठिकाणी एकेरी रोड असल्याचे माहिती असून सुध्दा त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी बस अतिवेगाने चालवून मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे येणाऱ्या आयशर टेम्पोला समोरासमोर धडक दिली.
या भीषण अपघातात आयशर टेम्पो चालक दिनेश वासुदेव यादव (वय ४८ वर्षे) रा. वापी, गुजरात याच्या उजव्या पायास गंभीर जखमा होऊन त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्याच्यावर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.आदित्य शिरसाट यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

तसेच एस टी बस मधील जखमी प्रवाशांमध्ये १) जमील मोहम्मद अली येलूकर (वय २१ वर्षे) रा. वडवली, माणगाव २) सोनू भागुजी शीद (वय ५४ वर्षे) रा. वडपाली, माणगाव ३) अनघा आतील सावंत (वय ५५ वर्षे) रा. महाड ४) सायली सुनील कोंढाळकर (वय २० वर्षे) रा. वरंध, महाड ५) निर्मिती निलेश कडू (वय १९ वर्षे) रा. माणगाव ६) आर्या साळुंखे (वय २२ वर्षे) रा. माणगाव ७) संतोष सखाराम शिंदे (वय ५२ वर्षे) रा. राजावली, महाड, ८) मुकुंद संजय कदम (वय २५ वर्षे) रा. खर्डी, महाड, ९) रोहिणी अरुण भोनकर (वय २५ वर्षे) रा. पीडब्ल्यूडी ऑफिस माणगाव १०) सोनाली सोनू शिंदे (वय ४८ वर्षे) रा. वडपाले, माणगाव असे १० प्रवासी जखमी झाले असून त्यांना किरकोळ दुखापती व मुक्का मार लागला आहे. जखमी प्रवाशांवर प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान महामार्गावरून मुंबईकडे प्रवास करीत आलेले राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना. भरत गोगावले यांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली तसेच अपघाताची माहिती घेतली. यावेळी महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलेले अप्पर पोलिस अधिक्षक अभिजित शिवथरे सुद्धा उपस्थित होते. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस करीत आहेत.