पूरमहाराष्ट्र ग्रामीण

रिलायन्स कंपनीच्या करोडो रुपयांच्या हायटेक नवीन कॉलनीत पाणीच पाणी 

नियोजनशून्य कामामुळे कॉलनी परिसरात तुंबले चार फूट पाणी 

रिलायन्स कंपनीच्या करोडो रुपयांच्या  हायटेक नवीन कॉलनीत पाणीच पाणी 

नियोजनशून्य कामामुळे कॉलनी परिसरात तुंबले चार फूट पाणी 

निसर्गाच्या विरोधात जाऊन कॉलनीचे बांधकाम केल्यानेच पाणी तुंबल्याचा आरोप 

तळ मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांचे अतोनात नुकसान : कुटुंबाचे केले स्थलांतर 

रिलायन्स व एल अँड टी कंपनीच्या नियोजनशून्य कामाचा फटका 
महेश पवार 
नागोठणे : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे येथील प्रकल्पातील अधिकाऱ्यांसाठी कंपनीच्या जुन्या निवासी संकुला समोरच महाकाय हायटेक अशी नवीन कॉलनी बांधण्यात आली आहे. मात्र ही कॉलनी बांधण्यासाठी नावाजलेल्या एल अँड टी कंपनीला करोडो रुपयांचे कंत्राट देणाऱ्या रिलायन्स कंपनी व्यवस्थापन व कॉलनी बांधणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनाचा फटका सध्या कॉलनीत राहणाऱ्या अधिकारी वर्गाच्या कुटुंबांना बसला आहे.
सोमवारी (दि.१८) पडलेल्या पावसामुळे या कॉलनीच्या आवारात तीन ते चार फूट पाणी जमा झाले होते. त्यामुळे कॉलनीत पार्किंग केलेली वाहने बुडाली होती. तर तळ मजल्यावर राहणाऱ्या रिलायन्सच्या अधिकारी वर्गाच्या कुटुंबीयांचे प्रचंड हाल झाल्याने त्यांना इतरत्र हलवावे लागले शिवाय त्यांच्या सामानाचेही नुकसान झाले आहे. करोडो रुपये खर्चून बांधलेल्या प्रशस्त व दिमाखदार दिसणाऱ्या या कॉलनीची अवस्था पाहून सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन (एन एम डी) प्रकल्पातील अधिकाऱ्यांसाठी नवीन वसाहत बांधतांना शेकडो एकर जागेवर करण्यात आलेला प्रचंड भराव, कॉलनीच्या मागील बाजूस पश्चिमेकडे मोठे डोंगर असल्याने या डोंगरातून पावसाळ्यात पाण्याचा मोठा लोंढा येणार असल्याचे माहित असूनही या मोठ्या पाण्याच्या प्रवाहाचा निचरा होण्यासाठी नियोजन न करणे, कॉलनीच्या जागेवर असलेल्या जंगलातील व ऑक्सिजन देणाऱ्या शेकडो झाडांची कॉलनी उभारताना केलेली कत्तल, आपला हक्काचा निवारा नाहीसा झाल्याने मोठ्या प्रमाणात विषारी साप बाहेर पडल्याने त्यांचा वाढलेला धोका, रिलायन्सच्या इतरत्र असलेल्या संपादित जागेवर कॉलनी न बांधता केवळ ही झाडा झुडपांनी व परिसराला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी मोठ मोठ्या वृक्षांनी भरलेली शेकडो एकर महत्वाची जागा विनाकारण सिमेंटच्या जंगलाने भरण्यात आली. त्यामुळेच माता श्री  करकरणी देवी या जागृत देवस्थानच्या डोंगराखालील जागी विनाकारण व मोकळी जागा अडकवून ठेवण्यासाठी केलेल्या या कॉलनी मुळे करकरणी मातेचा कोप तर झाला नाही अशी चर्चा स्थानिक नागरिकांतून होत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन (एन एम डी) प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यासाठी कंपनीच्या जुन्या निवासी संकुलातील मोठ्या प्रमाणातील जागेतील काही इमारती पाडून त्या मोकळ्या केलेल्या जागेवर रिलायन्सचा प्रकल्प विस्तारित करण्याचे कंपनी  व्यवस्थापनचे प्रयोजन आहे. रिलायन्सच्या जुन्या निवासी संकुलातील इमारती पडल्यानंतर त्यामध्ये राहणाऱ्या रिलायन्सच्या अधिकारी वर्गासाठी नव्याने कॉलनी बांधण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी जुन्या निवासी संकुला समोर पश्चिम दिशेला असलेल्या आणि जागृत देवस्थान म्हणून परिसरात प्रचलित असलेल्या श्री करकरणी मातेच्या डोंगराखालील बाजूस असलेली कंपनीच्या मालकीची शेकडो एकर जागा निवडण्यात आली.
याच जागेवर कॉलनी बांधण्याचे काम रिलायन्सने प्रसिद्ध अशा एल अँड टी या मोठ्या कंपनीला दिले. डोंगराखालील जंगल व मोठमोठ्या वृक्षांचा परिसर असलेल्या या शेकडो एकर जागेवर एसी केबिन मध्ये बसून निसर्गाच्या विरोधात जाऊन कॉलनी बांधण्याचा आराखडा रिलायन्सच्या नावाजलेल्या व गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अभियंत्यांनी तयार केला. मात्र नियोजित कॉलनीच्या जागेची भौगोलिक परिस्थित माहिती नसल्याने आणि स्थानिक नागरिकांकडून त्याविषयी जाणून घेण्याचे कष्टही रिलायन्स व एल अँड टी च्या अभियंत्यांनी न घेतल्याने कॉलनीच्या कामात अनेक त्रुटी राहिल्याने कॉलनी परिसरात ३ ते ४ फूट पाणी तुंबल्याची परिस्थित निर्माण झाली. महाकाय डोंगराच्या पायथ्याशी ही कॉलनी बांधण्यात आल्याने यामध्ये राहणाऱ्या कुटुंबांना भविष्यातही धोका असल्याने रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने याबाबतीत योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. यासंदर्भात रिलायन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर  संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!