आर्थिक घडामोडीगुन्हेगारी वृत्तमहाराष्ट्र ग्रामीण

स्वराज्य ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत करोडो रुपयांची अफरातफर 

संस्थेचा चेअरमन प्राणयकुमार सावंत व सचिव संजीवन पाटील यांना अटक 

स्वराज्य ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत करोडो रुपयांची अफरातफर 

संस्थेचा चेअरमन प्रणयकुमार सावंत व सचिव संजीवन पाटील यांना अटक 
दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी
महेश पवार 
नागोठणे : ज्या विश्वासाने ठेवीदारांनी आपल्या कष्टाची कमाई ठेवण्यास दिली त्याच विश्वासाला मोठा तडा लावण्याचा पराक्रम करणाऱ्या  नागोठण्याजवळील शेतजुई(ता. पेण) येथील स्वराज्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रणयकुमार हिंदुराव सावंत, रा. रिलायन्स टाउनशिप (मूळ रा. नेरे, कराड) व सचिव संजीवन विनायक पाटील, सध्या रा. सेक्टर १९, नवीन पनवेल, (मूळ रा. आरोडे, ता.  तासगाव, जि. सांगली) या दोघांना पतसंस्थेतील सुमारे ३ कोटी, ८३ लाख, ५१,२६१ एवढ्या मोठ्या रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी  नागोठणे पोलिसांनी अटक केली आहे. रकमेचा अपहार केल्याचा हा गुन्हा २८ मार्च, २०१२ ते ८ डिसेंबर, २०२२ दरम्यान घडला आहे.
या प्रकरणातील दोन्ही आरोपींविरोधात नागोठणे पोलिस ठाण्यात २२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी  साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना शनिवारी (दि.२३) सकाळी  अलिबाग येथील सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना २६ ऑगस्ट पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. कर्जत येथील सहकारी संस्थांचे लेखापरीक्षक श्रेणी २ चे अधिकारी अंकुश शिंदे यांच्या फिर्यादीनुसार नागोठणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 
यासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार नागोठण्याजवळील शेतजुई येथे स्वराज्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केल्यानंतर आरोपी प्रणयकुमार सावंत संस्थापक चेअरमन म्हणून तर दुसरा आरोपी संजीवन पाटील सचिव म्हणून कार्यरत होते. ही पतसंस्था रिलायन्स निवासी संकुलाच्या जवळच असल्याने आणि दोन्ही आरोपी हे त्यावेळी रिलायन्स कंपनीचे कर्मचारी असल्याने ते रिलायन्स कॉलनी मध्येच राहण्यास होते. रिलायन्स कॉलनीत राहणारे कंपनीतील आपल्या इतर  सहकाऱ्यांचा विश्वास या दोघांनी संपादन केला. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी सुमारे दहा वर्षाच्या काळात ५७६ ठेवीदारांकडून सुमारे ३ कोटी, ८३ लाख, ५१,२६१ एवढी मोठी रक्कम ठेवींच्या स्वरूपात जमा केली. मात्र या रकमेचा योग्य हिशोब या दोन्ही आरोपींनी ठेवला नाही. त्यामुळे सर्व ठेवीदारांना त्यांची ठेवींची रक्कम परत देण्यास हे दोन्ही आरोपी टाळाटाळ करू लागले. तसेच ठेवींची रक्कम परत न करण्याबरोबरच पतसंस्थेतील डे बुक, सब डे बुक व कॅश बुक मध्ये खोटा हिशोब तयार करून बनावट अभिलेख तयार केले. अशाप्रकारे पतसंस्थेतील सर्व ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना नागोठणे पोलिसांनी जेरबंद केल्याने तसेच कोर्टाने आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी दिल्याने पोलिसांच्या तपासात अजून काही धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पुढील तपास नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी हे स्वतः करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!