अपघातकायदेविषयकमहाराष्ट्र ग्रामीण
महिलेचे प्राण वाचविणाऱ्या पोलिसांचा नागोठणे ग्रामपंचायतीकडून सत्कार
प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, पो. ह. महेश लांगी, पो. ह. सुनील वाघ व पो. शि. स्वप्नील भालेराव यांनी केली होती धडाकेबाज कामगिरी

महिलेचे प्राण वाचविणाऱ्या पोलिसांचा नागोठणे ग्रामपंचायतीकडून सत्कार
प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, पो. ह. महेश लांगी, पो. ह. सुनील वाघ व पो. शि. स्वप्नील भालेराव यांनी केली होती धडाकेबाज कामगिरी
महेश पवार
नागोठणे : घरगुती भांडणातून स्वतःला संपविण्याचा उद्देशाने नागोठण्यातील जुन्या ऐतिहासिक पुलावरून अंबा नदीत उडी मारलेल्या रामनगर येथील २५ वर्षीय आशा दीपक गुंजाळ या विवाहित महिलेला वाचविण्याची धडाकेबाज आणि सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या नागोठणे पोलिसांचा नागोठणे ग्रामपंचायतीकडून यथोचित सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, पो. ह. महेश लांगी,
महामार्ग पोलिस पथकात महाड येथे कार्यरत असलेले पो. ह. सुनील वाघ, नागोठणे पोलिस ठाण्यातील पो. शि. स्वप्नील भालेराव यांचा समावेश आहे.

नागोठणे ग्रामपंचायतीच्या स्व. बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयाच्या इमारती मधील सभागृहात मंगळवारी (दि.९) सकाळी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक, पाहिले लोकनियुक्त सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच अखलाक पानसरे, सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, प्रकाश कांबळे, ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे, गुड्डू पोत्रिक, सज्जाद पानसरे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रमोद चोगले, दिलीप तेलंगे, संतोष जोशी, अमोल ताडकर, होमगार्ड शशिकांत पाटील आदींसह पत्रकार उपस्थित होते.

नागोठणे पोलिसांच्या या महत्वपूर्ण कामगिरीमुळे एका महिलेचे प्राण वाचविण्यास आम्हाला यश आले असले तरी कुटुंबात काही भांडण, वाद असतील तर ते एकत्र बसून चर्चा करून सोडवावेत. आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. त्यामुळे स्वतःचे जीवन संपविण्यापर्यंतचा टोकाचा निर्णय घेऊ नये असा मोलाचा सल्ला यावेळी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी यावेळी दिला.
नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत दि.२१ ऑगस्ट रोजी रात्री ९.१५ वाजण्याचे सुमारास महामार्ग पो.ह. सुनील वाघ व नागोठ्यातील पत्रकार महेंद्र म्हात्रे हे वरवठणे येथील जुना अंबा नदी पुलाजवळ असताना एक महिलेने नागोठण्यातील जुन्या पुलावरून तुडुंब भरलेल्या अंबा नदीचे पात्रात उडी मारल्याचे पहिले. ही माहीती सुनील वाघ यांनी तत्काळ नागोठणे पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी तसेच पो.ह. महेश लांगी व पो. शि. स्वप्नील भालेराव हे सर्वजण पो. ह. सुनील वाघ यांच्या समवेत खाजगी वाहनाने अंबा नदीच्या पाण्याचे प्रवाहाचे सुमारे २०० मीटर पुढे असलेल्या रिलायन्स चौक येथील रस्त्यावरील पुलाचे खालील बाजूस पाण्याचे प्रवाहाच्या ठिकाणी उतरले. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता पो. ह. सुनील वाघ व पो. शि. स्वप्नील भालेराव या दोघांनी नदीच्या प्रवाहामध्ये उडया मारल्या. त्यांना सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व पो.ह. महेश लांगी यांनी दोरीच्या सहायाने मदत केली. या सर्वांनी मिळून पाण्यात उडी मारलेल्या महीलेला दोरीच्या सहायाने पाण्यातुन खेचुन बाहेर काढून तिचे प्राण वाचविण्याचे मोलाचे कार्य केले. त्यानतंतर या महिलेवर दवाखान्यामध्ये नेवुन औषधोपचार करण्यात आले. या महिलेचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी चांगल्या पद्धतीने समुपदेशन करून तिला तिचे पती दिपक गुंजाळ यांचे ताब्यात दिले होते.




