कायदेविषयकगुन्हेगारी वृत्तमहाराष्ट्र ग्रामीण

मोटार सायकल चोरी

इतर चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असण्याची शक्यता

मोटार सायकल चोरी प्रकरणी बाल गुन्हेगारावर नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इतर चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असण्याची शक्यता
नागोठणे : नागोठणे पोस्ट ऑफिस समोरील मन सरोज प्लाझा हौसिंग सोसायटी या इमारतीच्या खाली पार्किंगच्या जागेत उभी करून ठेवलेली मोटारसायकल चोरलेल्या साडेसोळा वर्षीय बाल गुन्हेगारा विरोधात नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अन्य मोटारसायकलच्या चोऱ्यांसह इतर छोट्या मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये या बाल गुन्हेगाराचा सहभाग असल्याची शक्यता निर्माण झाल्याने नागोठणे पोलिस यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
यासंदर्भात नागोठणे पोलिस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार नागोठणे पोस्ट ऑफिस समोरील मन सरोज प्लाझा या इमारतीत राहणारे ॲड. महेश पवार यांनी आपली हिरो होंडा पॅशन (क्र. एम.एच.०६ यु ४३६६) ही सुमारे ५१ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल इमारतीच्या खालील पार्किंगच्या जागेत नेहमीप्रमाणे उभी करून ठेवली होती. बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी ॲड. महेश पवार आपली मोटारसायकल घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना आपली मोटारसायकल आढळून आली नाही. त्यांनी इमारतीच्या आजुबाजूला, तसेच एस. टी. बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि परिसरात दिवसभर आपल्या मोटारसायकलचा शोध घेतला असता त्यांना मोटारसायकल सापडली नाही. त्यामुळे कुणीतरी अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरल्याची खात्री झाल्याने ॲड. महेश पवार यांनी नागोठणे पोलिस ठाण्यात ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९.५८ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल चोरीला गेल्याची फिर्याद दिली.
दरम्यान गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी  नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. महेश रुईकर, पो. शि. विक्रांत बांधणकर यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून नागोठण्यातील महामार्गालगत असलेल्या रामनगर येथे जाऊन तेथील साडेसोळा वर्षीय संशयित बाल आरोपी यास नागोठणे पोलिस ठाण्यात घेऊन येण्यास त्याच्या आईला सांगितले. त्यानुसार या बाल आरोपीकडे पोलिसांनी त्याच्या आई समक्ष चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. बाल आरोपीने दिलेल्या माहितीनुसार चोरीला गेलेली मोटारसायकल पोलिसांनी मोटारसायकल टाकलेल्या ठिकाणी नागोठणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या घनदाट झाडीझुडपातून बाहेर काढून पंचनामा करून ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये बाल गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भविष्यात मोठा होऊन अट्टल गुन्हेगार होण्या आधीच नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. महेश रुईकर व पो. शि . विक्रांत बांधणकर यांनी अवघ्या बारा  तासांत गुन्ह्याचा तपास करून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केल्याने या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. महेश रुईकर हे करीत आहेत. दरम्यान नागरिकांनी जागरूकता  दाखवून चोरी वा अन्य कोणत्याही घटनेची माहिती लागलीच पोलिस यंत्रणेला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!